सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. अक्कलकोट येथील चोरीच्या गुन्हयाची उकल करीत २७ तोळे सोने व ५६ ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा सुमारे १६ लाख ७६,००० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१५ डिसेंबरच्या रात्री साडेआठ ते २१ डिसेंबर रोजीच्या दुपारी पावणे बारा वाजेचे सुमारास अक्कलकोट शहरातील खासबाग परिसरातील घरामध्ये अज्ञात चोरटयाने प्रवेश करून किचन घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले २७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ५६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे व 50 हजाराची रोकड चोरीला गेली होती. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरनं ६५१/२०२३ भादंवि कलम ३८० प्रमाणे २२ डिसेंबर रोजी रोजी दाखल आहे.
या गुन्हयात मोठया प्रमाणात सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर यांनी सपोनि शशिकांत शेळके व त्यांच्या पथकास गुन्हयाच्या ठिकाणी भेट देवुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे शशिाकंत शेळके व त्यांचे पथक खासबाग अक्कलकोट येथे जावून फिर्यादीची भेट घेवून सविस्तर माहिती घेतली. वारंवार चौकशी दरम्यान शेजारी राहणाऱ्या महिलेचे चपला घरासमोर होत्या. त्या परत केल्याचे सांगण्यात आले. शेजारी महिलेला चपल्या कशा विसरल्या? हे विचारले असता माहित नाही? कदाचित कुत्र्याने नेल्या असतील असे तिने मोघम उत्तर दिले. कुत्रे एकच चप्पल आणू शकते, दोन्ही चपल्या यांच्या घराजवळ कशा आल्या? याचा शोध पोलिसांनी घेतल्यावर त्या महिलेवर संशय बळावला. याच महिलेने चोरी केली असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून महिला पोलीस अंमलदार समवेत जावून बातमीतील नमूद महिलेस गुन्हयाच्या चौकशीकामी ताब्यात घेऊन तिच्याचकडे चौकशी केल्यावर तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू तिचा अधिक संशय बळावल्याने तिस अधिक विश्वासात घेवून कौशल्यपूर्ण तपास करता तिने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. तेंव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीस गेलेल्या मुद्देमालातील सोन्याच्या पाटल्या, राणीहार, गंठण, मिनी गंठण, लॉकेट, बांगड्या, कानातील फुले झुबे, मोतीचूर अंगठी, नाकातील नथ असे सोन्याचे दागिणे व चांदीचे पैंजन व जोडवे असे दागिणे व 50 हजार रोख रक्कम असा एकूण १६ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, आपण पोलीस प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, पोसई राजेश गायकवाड, सफौ नारायण गोलेकर, पोहेकॉ धनाजी गाडे, मोहन मनसावाले, महीला पोलीस अंमलदार मोहीनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते, समीर शेख यांनी बजावली आहे.