सोलापूर: एक जिल्हा एक उत्पादन यासाठी महाराष्ट्र शासनाने सक्रीय सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी व काम केल्याने केंद्र सरकारच्या डीपीआयआयटी विभागांतर्गत महारष्ट्राने निर्यातीमध्ये केलेली अतुलनीय कामगीरीबाबत बक्षीस मिळाले आहे.
केंद्र शासनातर्फे निर्यातीस प्रोत्साहान मिळावे आणि उद्योग वाढीस चालना मिळावी यासाठी एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे उत्पादनाची मुल्यवर्धीत साखळी वृद्धीगत करुन ब्रॅण्ड डेव्हलपमेंटसाठी जिल्हा पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शेती उत्पादन व एक बिगर शेती उत्पादन हे एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम म्हणून ओळखले आहेत. या उत्पादनाची मुल्यवर्धन साखळी वृद्धींगत करण्यासाठी व ब्रॅण्डीग डेव्हलपमेंट, निर्यातक्षम उत्पादन यांना मागदर्शन मिळावे यासाठी एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित तज्ञ संस्थाचे मार्गदर्शन इत्यादी बाबीवर आधारीत वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हा पातळीवर निर्यात कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. सदर कार्यशाळेत विविध निर्यातीत निर्यात प्रचलन परिषद, उद्योजक, स्थानिक पातळीवरील अधिकारी, हे उपस्थित होते.
प्रत्येक जिल्हयामध्ये निर्यातीस प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रशासकीय पातळीवरुन उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी वेळोवेळी कार्यशाळा घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उद्योग विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह यांनी जिल्हा पातळीवर असलेल्या उद्योग विभागातील सर्व अधिकारी, उद्योजक, स्थानिक पातळीवरील निर्यातदार यांच्यासमवेत वेळोवेळी बैठका घेऊन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. एक जिल्हा एक उत्पादन या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांना दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रालाही बक्षीस जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने उद्योग विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश वायचळ यांनी भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकरन आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते हे पारितोषिक स्वीकारले.