सोलापूर : महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी दोन हजार कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ व शिलान्स होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथ्यांदा शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. रे नगर प्रकल्पातील १५ हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी होणार आहे त्याचबरोबर अमृत योजना, अटल योजना, सोलापूर जिल्हा व राज्यातील सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या योजनांचा यावेळी शुभारंभ केला जाणार आहे. या योजनांबरोबरच पंतप्रधान मोदी सोलापूरसाठी आणखी नवीन काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांच्या तासाभराच्या दौऱ्यात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.पंतप्रधान मोदी हे नियोजित वेळेवर हेलिपॅडवर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, मुख्य सचिव, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी,विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित असतील. प्रोटोकॉलप्रमाणे व्यासपीठावर या मंत्रिमंडळाबरोबरच रे नगरचे प्रवर्तक आडम मास्तर यांच्याशिवाय कोणी नसणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सहा हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनेच कार्यक्रमस्थळी येणार आहेत. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर असतील. इतर हेलिपॅड मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या आगमनासाठी वापरण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. सोलापूर पंतप्रधान मोदी कर्नाटक व तामिळनाडू कडे रवाना होणार आहेत.