सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पशु चिकित्सालयातील जनावरांच्या डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे Ai टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना फोनद्वारे चौकशी करून नागरिकांची मते जाणून घेत असताना सर्वाधिक तक्रारी जनावरांच्या डॉक्टरांच्या येत आहेत. Ai तंत्रज्ञानाच्या आधारावर देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासन करीत असताना, ही धक्कादायक बाब पुढे आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन सोलापूरच्या वतीने उडान-2025 अंतर्गत प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर व प्रशिक्षण हा कार्यक्रम बुधवार, दि. 30 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आला. या AI प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याहस्ते करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटननंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Ai टेक्नॉलॉजीचा वापर करीत नागरिकांची थेट संवाद साधून सरकारी कामकाजाविषयी तीन प्रश्न विचारले जातील असे सांगितले होते. प्रायोगिक तत्वावर शिक्षण महिला व बालकल्याण जिल्हा पुरवठा विभाग पशुसंवर्धन व आरोग्य विभागाचा समावेश करण्यात आला आहे. Ai कक्षातून दररोज 15 ते 20 हजार नागरिकांशी संपर्क साधला जात आहे. या तंत्रज्ञानातून संपर्क साधलेल्या व्यक्तीला 30 सेकंदात तीन प्रश्न विचारले जातात. त्यातून जे उत्तरे मिळतात त्यावर काम केले जात आहे. तुम्हाला रेशनचे धान्य मिळते का? किती मिळते? दुकान कधी उघडे असते, आरोग्य केंद्रात डॉक्टर येतात का? गुरुजी शाळेवर वेळेवर येतात का? जनावरांच्या चिकित्सालयात सुविधा आहे काय? असे प्रश्न विचारून संबंधित ठिकाणाच्या सेवेबाबत माहिती घेतली जात आहे. यात बऱ्याच नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी संबंधित विभाग प्रमुखाला कारवाईचे आदेश देत आहेत. गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावराच्या दवाखान्याच्या कामकाजाविषयी अशी दररोज लोकांकडून माहिती घेतली जात आहे.
शिक्षण, आरोग्यात सुधारणा
या प्रयोगाला दहा महिने होत आहेत. लोकांकडून आलेल्या फीडबॅक मधून शिक्षण व आरोग्य विभागात चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. जनावराच्या दवाखान्याबाबत मोठ्या तक्रारी आहेत. जनावराचे डॉक्टर वेळेवर येत नाहीत, खाजगी डॉक्टर दिमतीला आहेत, एजंट आहेत अशा तक्रारी वाढल्या आहेत. जनावरांच्या दवाखान्यात पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळेच गावातील काही मंडळी ठाण मांडून आहेत. याचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. बहुतेक शेतकरी शेतात जनावरांसह राहावयास आहेत. शेतातील गोठ्यांपर्यंत हे डॉक्टर पोहोचत नाहीत. आजारी जनावरांवर खाजगी डॉक्टरच उपचार करतात. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय लसीकरण वेळेवर व पूर्णपणे केले जात नाही. त्यामुळे जनावरांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक रंगात आहे. फेब्रुवारी अखेर पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण जिल्हा परिषदेवर येईल. त्यावेळी मात्र हा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या जनावरांच्या डॉक्टरांचा पंचनामा होणार आहे.
नियंत्रण राहिले नाही…
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे पशुचिकित्सालय आहेत. पण वर्षापूर्वी राज्य शासनाने हा विभाग आपल्या अधिपत्याखाली आणला आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे या खात्यावर नियंत्रण होते. पण सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर तुर्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या खात्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
अडचणी आहेत…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी Ai सर्वेमध्ये सर्वाधिक तक्रारी जनावराच्या दवाखान्याबाबत असल्याचे मान्य केले. जनावरांच्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. शासनाने अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. लवकरच जनावरांच्या डॉक्टरांच्या सेवेमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

More Stories
विनायक कोंड्याल होणार सोलापूरचे महापौर
नीट परीक्षेत सोलापूरच्या डॉक्टर पती– पत्नीचे देश पातळीवर यश
सोलापुरात पारंपरिक वाद्यांत शिवजयंती मिरवणूक काढण्याचा निर्णय