सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाकडून अपेक्षेप्रमाणे आमदार देवेंद्र कोठे गटाचे विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी अनपेक्षितपणे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या दोघांनी सोमवारी अर्ज दाखल केले. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून याचवेळी शिंदे शिवसेनेकडून महापौर पदासाठी प्रियदर्शन साठे आणि एमआयएमकडून तौफिक हत्तुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
देवकर यांना लॉटरी
भाजपाकडून उपमहापौर पदाची लॉटरी ज्ञानेश्वरी देवकर यांना लागली आहे. त्या आमदार सुभाष देशमुख गटाच्या आहेत. प्रभाग 23 मधून त्या प्रथमच निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेचे प्रियदर्शन साठे तर एमआयएमकडून आसिफ शेख यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
आवाजी मतदानाद्वारे होणार निवड
६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या कॉन्सिल हॉल सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. महापालिकेत १०२ नगरसेवक असून यात सर्वाधिक ८७ भारतीय जनता पार्टीचे आहेत. एमआयएमचे ८, शिंदे शिवसेनेचे ४, काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा १ सदस्य आहे. सभागृहात थेट हात वर करून आवाजी मतदानाने ही निवड जाहीर होणार आहे. याआधी आज भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यात महापौर पदासाठी पक्षाकडून विनायक कोंड्याल व उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांची नावं निश्चित झाल्याचं सांगितलं. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपने या निवडणुकीसाठी पक्षाच्या नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे.
विरोधकांचीही तयारी
महापौर व उपमहापौर निवड बिनविरोध होऊ नये म्हणून विरोधकांनीही जोरदार तयारी केल्याचं दिसून आलं. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी प्रियदर्शन साठे हेच उमेदवार असतील असे जाहीर केले. आम्ही अल्पमतात तरीही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपाचे ८७ नगरसेवक असूनही पक्षाचा व्हिप काढावा लागतो, यात सारं काही आलं. काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक चेतन नरोटे आणि आसादे हे दोघे यावेळी उपस्थित होते.

More Stories
नीट परीक्षेत सोलापूरच्या डॉक्टर पती– पत्नीचे देश पातळीवर यश
सोलापुरात पारंपरिक वाद्यांत शिवजयंती मिरवणूक काढण्याचा निर्णय
सोलापूरचे उद्योजक तारासिंह राठोड यांना मिळाली डाॅक्टरेट