सोलापूर : जीवन म्हणजे एक रंगमंच आहे. या रंगमंचावर प्रत्येकाला विविध पात्र साकारायचे आहे. आयुष्याच्या या रंगमंचावर पात्र साकारताना आपली जबाबदारी व भूमिका कर्तव्य, अचूकता आणि प्रामाणिकपणाने पार पडावे, असे आवाहन सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
पंढरपूर येथील श्री. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकोणिसाव्या युवा महोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, एम. डी. कमळे, डॉ. एन. बी. पवार, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे यांच्यासह युवा महोत्सव समिती सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी व स्वागत प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले. खासदार डॉ. शिवाचार्य महास्वामी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव हा सृजन रंगाचा उन्मेष आहे. यामध्ये युवा विद्यार्थी कलावंतांनी उन्मेशाचा जल्लोष करून आनंद लुटावा. त्याचा बेरंग होऊ नये, याबाबत काळजी देखील घ्यावी. याचबरोबर जीवन जगत असताना आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे. या देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. तरुणांनी उज्वल भारताचे स्वप्न पूर्ण करावे. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही भारतीय लोककलेचा समावेश आहे. लोककला ही समाजात ऊर्जा निर्माण करण्याबरोबरच समाज प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. यंदाच्या युवा महोत्सवात प्रथमच लोककलेचा समावेश करण्यात आला आहे. सहभागी युवा विद्यार्थी कलावंतांनी चांगल्या प्रकारे सादरीकरण करावे, अशा शुभेच्छा ही नूतन कुलगुरू डॉ. महानवर यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.
माझी मैना गावाकडे राहिली…युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुंदर अशा अदाकारी व लोकगीतांतून विद्यार्थ्यांना भारावून टाकले. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली… हे गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. लोककला ही किती महत्त्वाची आहे आणि तिची जपवणूक कशी झाली पाहिजे याचे महत्त्व सांगून यावेळी डॉ. चंदनशिवे यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.