सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने आल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केलेल्या एका तरूणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आठजणांविरूध्द अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अभिजीत उत्तम केंगार (वय २१, रा. वाघोली, ता. माळशिरस) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंह मोहिते-पाटील (वय ४५) यांच्यासह गिरझणीचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर (वय ५२) व माजी सदस्य मयूर नवनाथ माने (वय ३३), हिरा रामचंद्र खंडागळे (वय ३०, रा.महर्षी काॕलनी, अकलूज) आणि इतर अनोळखी चार साथीदारांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (भारतीय दंड संहिता कलम ३०४,३२४, ३४) दाखल झाला आहे. यातील सतीश पालकर व मयुर माने यांना अटक झाली असता त्यांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मृत अभिजीत केंगार हा गेल्या १८ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा भटकत धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतापगड बंगल्यात शिरला. तो चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून जाड कारल व काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तो बेशुध्द पडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला असता गुन्हा निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सांगितले. पुढील तपास अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *