राजकुमार सारोळे

सोलापूर : सोलापूरचे दोन्ही टर्मचे भाजपचे खासदार निष्क्रिय आहेत, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. यावेळेस फक्त तुम्ही एकच करा, काँग्रेसचा खासदार निवडून द्या. सत्ता असो वा नसो विमानसेवा मी सुरू करतो, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रचार मोहीम जोरदारपणे सुरू केली असून पहिल्या टप्प्यात त्यांनी दक्षिण सोलापुरातील कंदलगाव, मंद्रूप, होटगी, वळसंग, बोरामणी व अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद मतदार संघात जोरदार बॅटिंग केली आहे. शिंदे यांनी हुरडा पार्टीच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराची जोरदार पेरणी केली आहे. शिंदे यांनी मंद्रूपमधील अनंत म्हेत्रे, होटगीमधील हरीश पाटील, वळसंगमधील मलकप्पा कोडले, बोरामणीमधील धनेश आचलारे आणि चपळगावमधील भंडारकवठे यांच्या हुरडा पार्टीला त्यांनी हजेरी लावली आहे.  यावेळी त्यांच्यासमवेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी सभापती अशोक देवकाते, मल्लिकार्जुन पाटील, महेश जोकारे, पंडित सातपुते, राजकुमार वाघमारे, शंकर येणेगुरे, आप्पासाहेब हलसगे, महेश पाटील, प्रकाश आवटे, चन्नवीर मटके, बाबुराव वडजे,  गौस शेख, दीपक नारायणकर, रफिक मुजावर, मल्लिनाथ आवटे संजय माळी, सोमनाथ कारंबे, विश्वनाथ हेबळे, सिद्धाराम माळी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांची संवाद साधताना शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर असताना भाजपने कारखान्याची चिमणी विमानसेवा सुरू करण्याचे निमित्त करून पाडली. मात्र आता आठ महिने होत आले तरी विमानसेवा सुरू झालेली नाही. जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ माझ्या कालावधीत मंजूर केले. त्यासाठी तीनशे एकर जमीन खरेदी केली. या ठिकाणी मोठी विमाने येणार होती. ही विमानसेवा सुरू झाली असती तर मोठ-मोठे उद्योग परिसरात आले असते. पण आमचे सरकार गेल्यावर माळढोकचे निमित्त करून भाजपने बोरामणीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ रद्द केले व होटगीरोड विमानतळ सुरू करण्याचा अट्टाहास केला. त्यासाठी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली. मग त्यांनी विमानसेवा का सुरू केली नाही असा सवाल त्यांनी केला. तुम्ही निवडून दिलेले दोन टर्मच्या भाजपच्या खासदारांनी काय विकास केला? हे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले आहेत, अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली. यावेळेस फक्त तुम्ही काँग्रेसचा खासदार निवडून द्या, सत्ता असो वा नसो, विमानसेवा मी सुरू करणारच, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी 2019 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यात अक्कलकोट तालुक्यातील 14 गावांना उजनीचे पाणी देतो असे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षे झाली अजूनही या भागाला थेंब पाणी दिलेले नाही. शिंदे मुख्यमंत्री असताना देगाव कालवा मंजूर केला. होटगीपर्यंत काम झाले पण भाजपने यासाठी निधीची घोषणा करूनही पुढे काम झालेले नाही, अशी टीका केली. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी या हुरडा पार्टी बैठकांचे नियोजन केले. हुरडा पार्टीच्या माध्यमातून काँग्रेसने दक्षिण सोलापूर व अक्कलकोट मध्ये चांगले पेरणी केल्याचे दिसून येत आहे. आता पुढील आठवड्यात इतर मतदारसंघाचा दौरा होणार असल्याचे सांगण्यात आले. इकडे अजून भाजपचा आगामी उमेदवार फिक्स नसताना काँग्रेसने मात्र आत्तापासूनच जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *