सोलापूर: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तीरे प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेत त्यांनी पाचवीचा वर्ग घेतला, शाळेत देण्यात येणारा आहार समाधानकारक नसल्याने मुख्याध्यापक व औषध साठा नोंदवही नसल्याने डॉक्टरांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी सकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील तीरे येथे दौरा केला. पहिल्यांदा त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. त्यावेळी तेथील आरोग्य अधिकारी डॉ. गोडसे विनापरवाना रजेवर असल्याचे दिसून आले. डॉ. राऊतराव यांच्याकडे औषध साठा नोंद वहिची विचारणा केली असता नोंदवही उपलब्ध नव्हती. रुग्णांना सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या जात असल्याचे दिसून आले व तसेच परिसरात स्वच्छता ही चांगली दिसून आली. त्रुटी बाबत डॉ. राऊतराव व डॉ. गोडसे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथे तीन शिक्षक रजेवर असल्याचे दिसून आले. पाचवीच्या वर्गावर जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान्य भोजनाची त्यांनी तपासणी केली. आहार साधारण असल्याचे दिसून आले. आहारात सुधारणा करण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या. त्यानंतर अभिलेख नोंद वहिची तपासणी केली असता आहारसाठा नोंदवही उपलब्ध नसल्याचे दिसून आले. तसेच उपस्थित विद्यार्थी व तयार करणाऱ्या आहारात तफावत दिसून आली. शासनाने ठरविलेल्या पाककृती प्रमाणे आहार नव्हता. धान्य साठवणूक खोलीची पाहणी केली असता मटकीला जाळ्या लागल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी जिल्हा प्राथमिक अधिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले नमस्कार यांना दिले.मुख्य कार्यकारी अधिकारी अचानक भेटीमुळे उत्तर तालुक्यात खळबळ उडाली आहे.