सोलापूर:भाजपचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर बँकांतून कर्ज घेतले जाते. त्यावर तक्रारी करूनही का कारवाई होत नाही. खरे तर याप्रकरणाची केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी करायला हवी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

सोलापुरात बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी एफआरपीसह शेतकऱ्यांशी संबंधित मुद्यांवर भाष्य केले. राज्यात सत्ताधारी भाजपच्या वळचणीला गेलेल्या प्रस्थापित साखर कारखानदारांनी स्वतःच्या कारखान्यांसाठी शेकडो कोटींची कर्जे घेतली आहेत. त्यासाठी नियम खुंटीला टांगण्यात आले आहेत. अन्य साखर कारखानदारांना कर्ज देताना कडक नियम दाखविण्यात आले आहेत. जो कोणी साखर कारखानदार भाजपच्या आश्रयाखाली जाईल, त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव होत असताना दुसरीकडे हेच साखर कारखानदार शेतक-यांची अडवणूक करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या साखर कारखान्याने तर शेतक-यांच्या नावाने परस्पर बँकांतून कर्जे उचलली आहेत. हा प्रकार सरळ सरळ फसवणुकीचा असताना बँकासुध्दा योग्य जबाबदारीने वागत नाहीत. एखादा शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी बँकेत गेला तर त्याला कायदे-नियम सांगितले जातात. किती तरी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु येथे राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांकडून शेतक-यांच्या परस्पर त्यांच्या नावाने बोगस कर्जे कशी दिली जातात ? याबद्दल संबंधित बँका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कारवाई का होत नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला.
यंदाच्या गाळप हंगामात कारखान्यानी अतिरिक्त ४०० एफआरपी दिली नाही तर,आम्ही कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. कारखान्यानी गेल्या हंगामात इथेनॉलमधून भरमसाठ कमाई केली आहे. सोलापूरसह राज्यातील अनेक साखर कारखान्याचे एफआरपी थकविली आहे. त्यांना गाळप परवाना देऊ नका, अशी मागणी साखर आयुक्तालयांकडे करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *