सोलापूर : सोलापूरला मंजूर झालेले मिलेट सेंटर बारामतीला नेण्याचा प्रश्नच येत नाही. मिलेट सेंटर बारामतीलाच मंजूर झालेले आहे, असे म्हणत जर तसे झाले असेल तर मी बारामतीचे मिलेट सेंटर रद्द करतो, असे उत्तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापुरात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. नियोजन भावनात बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी उजनीच्या पाणी साठ्याकडे लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले चार महिन्यात धरण मायनसवर येत असेल तर ही चिंतेची बाब आहे. धरणाच्या पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समिती आहे. इतक्या वेगाने पाणी संपवणे चुकीचे आहे. पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे यापूर्वी आम्ही ते केलेले आहे. पुण्याच्या धरणातील पाण्यात सोडणार का? यावर अजितदादा म्हणाले पुण्याच्या वरील धरणावर लोकसंख्या मोठी आहे. तेथील शेतकऱ्यांनाच पाणी मिळत नाही. आता तेथील धरणातील पाणी कसे सोडणार ? उजनीतील आहे त्याच पाण्याचे पिण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल. पिण्यासाठी ते पाणी पुरेल इतपत आहे. कर्नाटकचे शेतकरी पाणी उपसतात याकडे लक्ष वेधल्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले नदीची सीमा जशी असते तसे प्रत्येकाला पाणी घ्यावेच लागते. उद्या भविष्यात कर्नाटकचेही पाणी आपल्याला घ्यावे लागेल. सोलापूरची दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर हा प्रश्न येणार नाही. आपण सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत भरपूर पाणी सोडतो. भविष्यात हे पाणी कमी झाल्यानंतर हा प्रश्नच उद्भवणार नाही असे ते म्हणाले.
सोलापूरचे मिलेट सेंटर बारामतीला नेल्याबाबत विचारले असता बारामतीलाच मिलेट सेंटर मंजूर झाले आहे. 33 वर्षाच्या राजकारणात मी असे कोणत्याही जिल्ह्याचे काही पळवलेले नाही किंवा तसा माझा स्वभावही नाही. मिलेट सेंटर बारामतीलाच मंजूर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी दौऱ्यावर आल्यावर हा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी ही बाब मी स्पष्ट केलेली आहे. शासनाच्या अध्यादेशात सोलापूरचा उल्लेख असल्याचे निदर्शनाला आणल्यावर तसे असेल तर मी मग माझे बारामतीचेच मिलेट सेंटर रद्द करतो, असे अजित दादा म्हणाले .यापूर्वी एमएससीबीचे परिमंडळ कार्यालय नेल्याच्या प्रश्नालाही त्यांनी योग्य स्पष्टीकरण दिले.