सोलापूर : सोलापूर विचार मंचच्या डॉ.संदीप आडके यांना प्रधानमंत्री कार्यालयातून आलेल्या उत्तरात सोलापूरचे होटगीरोड विमानतळ हे ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यान्वित होईल तसेच ‘उडान’ योजनेअंतर्गत अलायन्स एअर कंपनीचे ए टी आर – ७२ विमानसेवा सोलापूर ते हैदराबादसाठी सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करावे असे पत्र डॉ. संदीप आडके यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेले होते.
सोलापूर विचार मंचच्या डॉ.संदीप आडके, संजय थोबडे, लिंगराज गुड्डूर, विठ्ठल वठारे, डॉ. हिरालाल गुल्लापल्ली यांनी होटगी रोड विमानतळावर प्रत्यक्ष जाऊन विमानतळ व्यवस्थापक चॅम्पला बानोत यांची भेट घेऊन सर्व कामांचा सखोल आढावा घेतला. त्यात पाण्याचे कनेक्शनचे काम पूर्ण झालेले आहे व विमानाची धावपट्टी,संरक्षण भिंत, ड्रेनेज, प्रवासी टर्मिनल, प्रशासकीय इमारत, वाहनतळ यांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच विमानतळाचे विस्तारीकरण करून दोन विमानांसाठी पार्किंगची व्यवस्था, अद्ययावत फायर फायटिंग स्टेशन, फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर अशा नव्या गोष्टींची उभारणी होणार आहे ही माहिती चॅम्पला बानोत यांनी दिली.
२०१४ मध्ये शेजारील सिद्धेश्वर कारखान्याच्या अनधिकृत चिमणीमुळे या विमानतळाचा प्रवासी परवाना रद्द केलेला होता. त्यानंतर चिमणीचा अडथळा हटवण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मागील चार वर्षात सोलापूर विचार मंचने न्यायालयीन व सर्व प्रशासकीय बाबींवर लढा देऊन १५ जून २०२३ रोजी चिमणी पाडण्यात यश मिळवले त्यानंतर तीन महिन्यातच धावपट्टीची दुरुस्ती करून महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करून प्रवासी वाहतुकीस परवाना मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते , परंतु नंतर सर्वच कामे मोठ्या प्रमाणावर करण्याचे ठरले व त्यामध्ये टेंडर काढण्यातच ऑक्टोबर महिना उजाडला व प्रत्येक ठेकेदारास सहा ते नऊ महिन्याचा अवधी देण्यात आला आहे.राजकीय व प्रशासकीय अनास्था मुळे टेंडर काढण्यात व पुढील कामात खूप वेळ गेला आहे. ही कामे संथ गतीने सुरू आहेत. विमानसेवेमुळे सर्वाधिक फायदा येथील व्यापारी, हॉटेल उद्योजक, पर्यटन व्यवसाय, धार्मिक पर्यटन यांना होणार आहे परंतु या लोकांकडून अनधिकृत चिमणी पाडकाम व विमान सेवा सुरू होण्यात पाठिंबा दिसला नाही. विमान सेवा सुरू झाल्यावर अनेक उद्योगधंदे सोलापुरात येणार आहेत व हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथून अन्य ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी बऱ्याच विमान कंपन्यांनी विचार मंच कडे उत्सुकता दर्शवलेली आहे. केवळ मागील बारा वर्षांमध्ये विमानसेवा नसल्यामुळे सोलापूरची सर्वच क्षेत्रात पीछेहाट झालेली आहे , त्यामुळे सर्वांनी येथील विमानसेवा लवकरात लवकर सुरू होण्याबाबत सातत्याने प्रयत्न व मागणी करणे आवश्यक आहे.
परंतु आता खुद्द प्रधानमंत्री कार्यालयातूनच डॉ. आडके यांना ३१ ऑगस्टची तारीख दिल्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त निश्चित झाला आहे असे डॉ. आडके यांनी कळवले आहे.