
सोलापूर : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादाबाबत दिलेल्या निकालानंतर सोलापुरात अजितदादांचे फॅन वाढले आहेत. चक्क ‘मालकां”च्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसवरही अजितदादा झळकले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. हा निर्णय देतानाच निवडणूक आयोगाने आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अजितदादा गटाने जल्लोष केला आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळेस व चार दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजितदादा सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले होते. या दौऱ्यात त्यांनी अनेकांशी भेटीगाठी केल्या. सोलापुरात अजितदादांचा गट भक्कम असल्याचे दिसून आले. अशात या निर्णयामुळे त्यांचे फॅन वाढले आहेत. अनेकांनी अजितदादांचे फोटो आपल्या स्टेटसवर शेअर केले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांचे खंदे समर्थक व मनपा स्थायी समितीचे माजी सभापती संजय कोळी यांनीही आपल्या स्टेटसवर अजितदादांसोबतचा आपला फोटो शेअर करीत ‘खरंच दादा अजितदादा” अशी कमेंट शेअर केली आहे. अजितदादांची भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही क्रेझ वाढत चालल्याचे आता दिसून येत आहे.



