सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. दिलीप माने हेही आमदार होते. तालुक्यात या दोघांचे एक तरी भरीव काम दाखवा? असे आव्हान आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूप येथे संवाद साधताना दिले.
‘गाव चलो अभियान” अंतर्गत आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी मंद्रूप येथील बारा बुथवर भेटीगाठीचा कार्यक्रम केला. ग्रामदैवत श्री मळसिद्ध देवस्थानचे दर्शन घेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी तमन्ना पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बूथ वरील कार्यकर्ते, मतदार यांच्या भेटी घेऊन संवाद साधला. भाजपचे ज्येष्ठ नेते हेमंत स्वामी व इतर जुन्या लोकप्रतिनिधींची त्यांनी यावेळी भेट घेतली. गावातील शाळा, अंगणवाडी, आशा वर्कर, मंदिर, मज्जिद प्रमुखांची भेट घेऊन संवाद साधला. रावजी तांडा येथे भाजपचे तालुका सरचिटणीस विलास चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर मुक्कामी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णाराव बाराचारे, होटगीचे सरपंच जगन्नाथ गायकवाड, पर्यवेक्षक मळसिद्ध मुगळे यांची भाषणे झाली. त्यानंतर ‘सोलापूर समाचार” शी संवाद साधताना आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कामाची माहिती दिली. आगामी निवडणुकीत मी केलेले कामच माझे भवितव्य ठरवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण विधानसभेसाठी इच्छुकांच्या रांगेबाबत बोलताना त्यांनी ‘या” इच्छुकांनी दक्षिण सोलापूरसाठी काय केले तेवढे सांगा? असा मिस्किल प्रश्न उपस्थित केला. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना याच तालुक्याचे प्रतिनिधी होते. मनात आणले असते तर त्यांनी या पदावर असताना तालुक्याचे चित्र पालटले असते. पण तसे झालेले नाही. दिलीप माने हेही या तालुक्याचे आमदार होते. या दोघांचे एक ठळक काम मला दाखवून द्या. मी तालुक्यातील जनतेसाठी काम केले आहे. माझे कामच माझी लोकप्रियता सांगू शकेल. मागील निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतदानाचे गणित मांडून काहीजण स्वप्न पाहत आहेत. पण 2019 च्या निवडणुकीत मला त्याआधीच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली आहेत हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असा टोला त्यांनी लगावला.
आमदार सुभाष देशमुख यांनी गाव चलो अभियानात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. घरोघरी भेटीगाठीमुळे त्यांनी आपले काम मतदारापर्यंत पोहोचवले आहे. गाव चलो अभियानामध्ये मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. प्रवासी कार्यकर्ते म्हणून मंद्रूप विभागाची जबाबदारी हनुमंत कुलकर्णी यांच्यावर आहे तर त्यांच्या सोबतीला पर्यवेक्षक म्हणून मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, विश्वनाथ हिरेमठ, जगन्नाथ हेळकर हे 12 बूथची जबाबदारी सांभाळत आहेत. याबरोबर विभाग प्रमुख, लाभार्थी प्रमुख, पन्ना प्रमुख, मन की बात प्रमुख असे 365 जणांचे मंडळ या अभियानात कार्य करत आहे. या अभियानात माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे, यतीन शहा, सोमशेखर बिराजदार, मंद्रूप ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, शिवपुत्र जोडमोटे, शिवानंद लोभे, दयानंद खाडे, सद्दाम शेख, नितीन रणखांबे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत