सोलापूर : प्रदीर्घ रजेवरून सेवेवर हजर झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांची थेअरी फेल गेली आहे. माध्यमिक शिक्षण विभागात पुन्हा शुकशुकाट पसरला असून जगताप हे नवे शिक्षणाधिकारी येतील अशी चर्चा रंगली आहे.
माध्यमिक शिक्षण विभागात शुक्रवारी हवेली मॅडम आणि केवळ दोन लिपिक हजर होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी फडके यांच्यासह इतर सर्वजण पुण्यामध्ये बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी फडके यांच्या घरी 17 फेब्रुवारी रोजी मंगलकार्य आहे. त्यासाठी ते पुन्हा रजेवर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता त्यांचा पदभार घेण्यास कोणीही तयार नसल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर येत्या काही दिवसात उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या होणार आहेत. त्यामध्ये तृप्ती अंधारे, नाळे, संजय जावीर हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षणाधिकारी फडके हेही पुण्याला बदलून जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी फडके रजेवरून सेवेवर हजर झाल्यावर शालार्थ आयडीची प्रकरणे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण कर्मचारी कमी व कोर्ट केसेसची कारणे सांगून त्यांनी आत्तापर्यंत वेळ मारून नेली आहे. नव्याने नियुक्त केलेले कर्मचारी जागेवरच बसत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे माध्यमिकमध्ये शिक्षक व कर्मचारी कामासाठी हेलपाटे घालत आहेत. शिक्षकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या ऐकून कोण घेणार असा प्रश्न आहे. ‘शिक्षकांचे एक तर संस्थाचालकांची दुसरीच मेख” असे अनेक प्रकार आहेत. या शिक्षकांना कधी न्याय मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.