सोलापूर: असाक्षर आणि स्वयंसेवक यांना प्रेरणा देणारी बारामती अन् सातारा येथील छायाचित्रे, रत्नागिरी येथील साक्षरता विषयक कलाकृती, कोल्हापूरच्या पथकाने हिंदीतून अफलातून सादर केलेला पोवाडा, साक्षरता विषयक उपक्रमांची माहिती देणारा सर्वसमावेशक स्टॉल तसेच अमरावती व गडचिरोली येथील स्वयंसेवक आणि असाक्षर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने दिल्ली येथे सहा व सात फेब्रुवारी रोजी केंद्रशासनाने आयोजित केलेल्या उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या राष्ट्रीय मेळाव्यातील महाराष्ट्राचा सहभाग लक्षवेधी ठरला.
केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने असाक्षर व नवसाक्षरांसाठी दोन दिवसीय ‘उल्लास मेला’चे आयोजन केले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, शिक्षण सचिव संजयकुमार, कौशल्य विकास सचिव अतुलकुमार तिवारी, एनसीईआरटीचे संचालक दिनेश कुमार सकलानी, शिक्षण सहसचिव अर्चना अवस्थी, राष्ट्रीय साक्षरता केंद्राच्या प्रमुख उषा शर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी दहा वाजता मेळाव्याचे उद्घाटन झाले.बुधवारी सायंकाळी झालेल्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार उपस्थित होते. यावेळी अर्चना अवस्थी, उषा शर्मा, अतिरिक्त सचिव विपिन कुमार,अवर सचिव प्रदीप हेडाऊ, शिक्षण संचालक प्रीती मीना उपस्थित होते.
या मेळाव्यात देशातील केंद्रशासित प्रदेश व घटकराज्ये मिळून ३० राज्ये सहभागी झाली होती.योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी सूचित केल्याप्रमाणे अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक असाक्षर व एक स्वयंसेवक यांना या मेळाव्यासाठी प्रत्यक्ष पाठवण्यात आले होते. योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर, सहाय्यक योजना अधिकारी विराज खराटे, एससीईआरटी येथील राज्य साक्षरता केंद्राच्या प्रमुख डॉ. गीतांजली बोरुडे,अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव, रत्नागिरी येथील विशेष निमंत्रित अनन्या चव्हाण व तिचे पालक संतोष चव्हाण, अमरावती येथील असाक्षर देविदास जिकर व स्वयंसेवक नागसेन रामटेके, गडचिरोली येथील असाक्षर रमेश सोनटक्के व स्वयंसेवक नंदकुमार मसराम, कोल्हापूरच्या कलापथकातील प्रा. तुकाराम कुंभार, शाहीर डॉ.आझाद नायकवडी,दशरथ कुंभार, उत्तम वाईंगडे,प्रभाकर लोखंडे, दशरथ पुजारी,रामदास देसाई, स्नेहलता पाटील,मायावती सोनटक्के, रूपाली चोथे यांचा वीस जणांच्या महाराष्ट्र पथकात समावेश होता.
राज्याने उभारलेल्या स्टॉलमध्ये विविध उपक्रमांची माहिती, प्रशिक्षणे, स्वयंसेवक मार्गदर्शिका, उल्लास प्रवेशिका एक ते चार, कृतीपत्रिका, मूल्यांकन पत्रिका, प्रश्नपेढी, चला जाऊ गोष्टींच्या गावा आदि विकसित केलेले साहित्य ठेवण्यात आले होते. राज्यातील साक्षरता विषयक निवडक व्हिडिओ आणि फोटो, भित्तीचित्रे, माहिती पत्रके, राज्य शिक्षण परिषदेचे छायाचित्रे स्टॉलमध्ये दर्शवण्यात आले होती. अतिरिक्त सचिव डॉ. आनंद पाटील यांनी स्टॉलला विशेष भेट दिली. नाशिक येथील मनपा शाळेच्या कुंदा बच्छाव या शिक्षिकेने तयार केलेले ‘माझ्या आईला शिकायचं आहे ना!’ हे व्हिडिओ गीत आणि बारामती(मूळगाव-टोणेवाडी या.बार्शी जि.सोलापूर) येथील रुचिता क्षीरसागर हिने गायलेले ‘हम मिलकर जुलकर लिखते पढते जायेंगे! हे व्हिडिओ गीत लक्षवेधक ठरले. परभणी येथील सुमनबाई चोखट या असाक्षर महिलेची मंजुषा आचमे या विषयसाधन व्यक्तीने घेतलेल्या मुलाखतीची चित्रफीतही प्रेरक होती. नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सार दर्शविणारे रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण हिने कॅनव्हासवर केलेले पेंटिंग केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्घाटन समारंभात अनन्याच्या हस्ते भेट देण्यात आले. मणक्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या व प्रत्यक्ष साक्षरता वर्गात न जाता घरीच साक्षरता वर्ग सुरू असलेल्या बारामती (मूळगाव-टोणेवाडी या.बार्शी जि.सोलापूर) येथील ७२ वर्षीय सुशीला क्षीरसागर आणि त्यांची नात रुचिता क्षीरसागर यांचे प्रेरणादायी छायाचित्र केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार यांना तर चिंचणी- सातारा येथील बबई मस्कर या ७६ वर्षीय महिलेचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र सहसचिव अर्चना अवस्थी यांना समारोप कार्यक्रमात भेट देण्यात आले. कोल्हापूर डायटचे अधिव्याख्याता तुकाराम कुंभार व शाहीर आझाद नायकवडी यांच्या चमूने नव भारत साक्षरता अभियानावर हिंदीतून सादर केलेला पोवाड्याने उपस्थित यांची मने जिंकली. ‘दिल्लीचेही तख्त राखितो,महाराष्ट्र माझा’ अशीच भावना महाराष्ट्रातील पथकात होती.
साक्षरता मोहिमेतील विद्यार्थ्यांना श्रेय
शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणे हे विकसित भारताचा महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांच्या जीवनात साक्षरतेमुळे नव्याने रंग भरले जात आहेत, त्यामुळे कार्यक्रमास लोकचळवळ बनवा. असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. या अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी अस असाक्षरांना साक्षर केल्यास त्यांना क्रेडिट्स(श्रेयांक) दिले जातील अशीही घोषणा त्यांनी केली. प्रत्येक व्यक्तीने किमान एका असाक्षराला साक्षर करावे तसेच २१ व्या शतकात आवश्यक असलेली कौशल्ये जसे की डिजिटल साक्षरता आर्थिक साक्षरता येण्यासाठी प्रयत्न करावेत.
असाक्षरांच्या चेहऱ्यावर हसू येऊ द्या
सातारा येथील ७६ वर्षीय बबई मस्कर या महिलेचे साक्षरता वर्गाच्या पहिल्या दिवसाचे प्रेरणादायी छायाचित्र केंद्रीय शिक्षण सचिव संजयकुमार यांनी समारोप प्रसंगी सर्व उपस्थित त्यांना दाखवून अशिक्षितांच्या चेहऱ्यावर याप्रमाणे हसू येऊ द्यात!असे आवाहन केले. सर्व राज्यांनी या मोहिमेला गती द्यावी जेणेकरून पुढील दोन-तीन वर्षात आपण जास्तीत जास्त असाक्षरांना साक्षर करू शकू. आपल्याला असाक्षरांच्या जीवनात उल्हास आणावयाचा आहे. या मोहिमेतील अडीअडचणी संदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.