सोलापूर :जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात विद्यार्थ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्व व जलसंवर्धन या विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मंगळवार दि.२० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर सुरु आहेत.पिण्याचे पाणी , पाणी पुरवठा योजना , योजनेमध्ये लोकसहभाग , पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाले नंतर योजनेची देखभाल तसेच योजना शाश्वत राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्रोत बळकटीकरणासाठी जल संवर्धन याचे महत्व विद्यार्थी दशेपासूनच रुजावे व त्यांच्यात पाण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा, सर्व तालुका स्तरावर निबंध , चित्रकला , लघुपट स्पर्धा तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयिन गटातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या तालुकास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या पहिल्या स्पर्धकांमधून जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.
या जिल्हास्तरीय महाविदयालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन,पाणी आडवा पाणी जिरवा,जल हेच जीवन , माझ्या गावातील पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती जल संवर्धन हे विषय आहेत.या वक्तृत्व स्पर्धांसाठी ११ वी ते १२वी हा कनिष्ठ गट व पदवीपर्यंत असे महाविदयालयीन दोन गट होते. सर्व तालुक्यातील या दोन्ही गटातील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांमधील स्पर्धकांसाठी जिल्हास्तरावर स्पर्धा होणार आहे.या जिल्हास्तरावरील दोन्ही गटात प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणा-या विद्यार्थ्यांना अनुक्रमे २१ हजार , ११ हजार व ५ हजार पाचशे रूपये अशी रोख बक्षीस , सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड यांनी केले आहे. तसेच तालुकास्तरावर निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेस विद्यार्थ्यांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या थेट तीन स्पर्धकांची नावे जाहीर केली जाणार आहेत.