- सोलापूर : जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना साने गुरुजींचा आदर्श सांगत फायनान्सच्याद्वारे लाखोच्या ठेवी स्वीकारून गायब असलेल्या ‘नाणेगुरुजी” च्या भानगडीची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी झेडपी प्रशासनाला दिले आहेत.
मंद्रूप परिसरातील अनेक गुंतवणूकदार सध्या चिंतेत दिसत आहेत. या भागात प्रसिद्ध असलेल्या ‘नाणेगुरुजी”नी जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करत असतानाच फायनान्सच्या माध्यमातून पिग्मीद्वारे ठेवी गोळा करून अनेकांना त्यांनी कर्ज देण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे शाळेबरोबरच छोटे व्यापारी, अडचणीत आलेले शेतकरी यांंना त्यांनी मासिक तीन ते पाच टक्के व्याजदराने पैसे देण्याचा उद्योग केला. अडचणीत असलेल्या अनेक लोकांची या खाजगी सावकारीला मोठी पसंती मिळाली. भांडवल वाढविण्यासाठी या माध्यमातून त्यांनी पुन्हा मित्र परिवारातून दाम दुप्पट व मासिक दीड टक्क्याचे अमिष दाखवत बेनामी ठेवी स्वीकारल्या. यातून त्यांची उलाढाल वाढत गेली व त्यांनी काहीना व्याजासह पैसेही परत केले. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. बक्कळ पैसा जमा झाल्यावर त्यांनी स्वतःसाठी माया जमविण्यास सुरुवात केली. जवळच्या नातेवाईकांसाठी पैसे गुंतवले. त्यामुळे साहजिकच पुन्हा त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. जानेवारीपासून अनेकांनी ठेवी परत मागितल्याने गुरुजी गायब झाले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांनी याबाबत तक्रारी सुरू केल्या आहेत. या गुरुजींकडे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचेही पैसे अडकल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या भानगडीची चर्चा वाढल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्ताकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी या गुरुजीची चौकशी करावी, असे झेडपी प्रशासनाला कळवले आहे.
कोण हे गुरुजी?
मित्रांनो ‘नाणेगुरुजी” हे प्रतिकात्मक नाव आहे. आपण शिक्षकांना ‘सानेगुरुजी” चा आदर्श सांगतो. पण अलीकडच्या काळात असा आदर्श पाळणारे गुरुजी कमी होत चालले आहेत. काही गुरुजनवर्ग तर पैशाच्या मागे लागल्याचे विदारक सत्य समोर येत चालले आहे. मंद्रूप परिसरातील अशाच गुरुजीची ही सत्य कहानी आहे त्यामुळे पैशाच्या मागे लागलेल्या या गुरुजीला ‘नाणेगुरुजी” असा शब्दप्रयोग केला आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या ‘नाणेगुरुजी”चा जरूर शोध घेईल, असा विश्वास वाटतो.