सोलापूर : मंद्रूपचे तत्कालीन अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना सांगली जिल्ह्यातील अष्ट्याचे अपर तहसीलदार म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जिल्हा म्हणून अपर तहसीलदार लिंबारे यांची पंधरा दिवसांपूर्वी बदली झाली होती पण त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. त्यांच्या जागी लातूरहून नरहरी बदलून आले आहेत. लिंबारे यांना पोस्टिंग न मिळाल्यामुळे महसूलमधील अधिकाऱ्यांचे त्यांच्या नियुक्तीकडे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी त्यांच्या नियुक्तीला मुहूर्त लागला. अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अष्ट्याच्या अप्पर तहसीलदारपदी लिंबारे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे. लोकाभिमुख कामाला आपले कायमच प्राधान्य राहणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी या नियुक्तीनंतर दिली आहे. त्याचबरोबर उत्तर सोलापूर तहसीलदारच्यापदी उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय स्थापन झाल्यावर पहिल्यांदा त्यांची नियुक्ती झाली होती. मागीलवर्षी त्या दक्षिण तहसीलकडे बदलून आल्या होत्या पण त्यांना हजर करून घेण्यात आले नव्हते. पुणे महसूलमध्ये जाऊन परत त्यांनी सोलापूर महसूलला येण्यात यश मिळवले आहे.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप