सोलापूर : सरकारी रिव्हॉल्व्हरने खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ (मूळ रा. सोलापूर) व पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड (रा. सांगोला) या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांना 15 फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढला आहे तर अहमदनगर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश सहा फेब्रुवारी रोजी सह परिवहन आयुक्त संजय मैत्रेवार यांनी काढला आहे. या दोघांवर नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम 307, 201, भा.दं.वि. 3, 25, भा.ह. का. अन्वये 12 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली. पण पोलीस तपासात खरा प्रकार उघड झाला. या गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाईंग स्कॉडने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. गायकवाड हे पूर्वी शेजवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात काम करत होते. यातून त्यांनी हा निधी गोळा केला. या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
शेजवळ यांची कारकीर्द वादग्रस्त
आरटीओ निरीक्षक शेजवळ दुसऱ्यांदा निलंबित झाले आहेत. 2016 मध्ये त्या धाराशिव आरटीओ कार्यालयात कार्यरत होत्या. या ठिकाणी त्यांनी वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणात गडबड केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले होते. दोन वर्ष निलंबित कालावधी झाल्यानंतर त्यांना नागपूर ग्रामीण सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी एका खाजगी व्यक्तीकडून लाच घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला. याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता हे गोळीबाराचे प्रकरण उघडकीस आले आहे.