सोलापूर : कुंभारी येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांचा 13 ऑक्टोबर 2014 रोजी माचर्ला मिलजवळ तलवारीसह घातक हत्याराने प्राणघातक हल्ला करून खून केल्याप्रकरणी दाखल गुन्हयात रमेश सिद्रामप्पा पाटील (रा.कुमठे, ता.अक्कलकोट) यांची जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती आर.एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, 13 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री 10 वा.च्या सुमारास कुंभारी येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे हे मार्चला मिलजवळून त्यांच्या राहत्या घराकडे मोटारसायकलवर सहकाऱ्यांसोबत जात असताना, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केला तर नबीलाल शेख याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केले, अशा आशयाची फिर्याद घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवलिंग पारशेट्टी यांने वळसंग पोलीस ठाण्यात दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाच्या तपासादरम्यान रमेश सिद्रामप्पा पाटील यांनी राजकीय फायदा मिळविण्याच्या हेतूने गुन्ह्यातील सहआरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोन्हेरीकर व प्रदिप मठपती यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये कट रचून खुनाची सुपारी दिल्याने सहआरोपींनी गुरुनाथ कटारे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीसांचे म्हणणे होते. तपासादरम्यान सहआरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोन्हेरीकर व प्रदिप मठपती यांना सन 2014 मध्ये अटक करण्यात आली होती व त्यांचे विरूध्द गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्याने खटल्याची सुनावणी होवून मे.सत्र न्न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या निकालास उच्च न्न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सुनावणीअंती उच्च न्यायालयाने प्रमोद स्वामी वगैरे यांना निर्दोष मुक्त केले होते. सन 2014 पासून रमेश पाटील हे सदर गुन्ह्यात फरार होते. त्यानंतर दि.7 जून 2023 रोजी रमेश पाटील हे अक्कलकोट येथील न्यायालयात हजर झाले. त्यानंतर या गुन्ह्याचे तपासअधिकारी उप- अधीक्षक नारायण सस्ते यांनी 8 जून 2023 रोजी रमेश पाटील यांना या गुन्ह्यात अटक करून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या
खटल्याची सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या अंतिम युक्तीवादावेळी आरोपीतर्फे अॅड.मिलिंद थोबडे यांनी सहआरोपीचा कबुलीजबाब रमेश पाटील यांच्याविरूध्द पुरावा म्हणून कायद्याने वापरता येणार नाही, कट रचण्याच्या घटनेबाबत सरकारपक्षाने कोणताही सबळ पुरावा सादर केलेला नाही, खून करण्यामागचा उद्देश व सहभाग देखील शाबीत करण्यात आलेला नाही असे मुद्दे मांडून त्या पुष्ठयर्थ उच्च व सर्वोच्च न्न्यायालयांचे न्यायनिवाडे सादर केले. ते ग्राहय धरून न्यायालयाने घटनेच्या 9 वर्षानंतर रमेश पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे ते पुत्र आहेत. यात रमेश पाटील यांचेतर्फे अॅड.मिलिंद थोबडे, अॅड.राजकुमार मात्रे यांनी तर सरकारतर्फे अॅड.ए.जी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.