सोलापूर :जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यालयाच्या टीमने ‘राज आलं, राज आलं, जग जिंकूनिया’ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीत सादर करताच सभागृहात एकच जल्लोष झाला. हे मर्दानी गीत सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची सभागृहातून एन्ट्री, फटाक्यांची आतिशबाजी ‘जय शिवाजी जय भवानी” गजरात सभागृहातील उपस्थित बेधुंद होऊन नाचले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद , सोलापूर आयोजित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचेहस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मृती सभागृहात सोमवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून एकपात्री अभिनय, स्टेज गीत, कविता सादरीकरण तसेच विविध गीते व डान्स, लोकनृत्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये जोष भरला होता. प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, सांस्कृतिक समितीचे प्रमुख तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, सुनिल कटकधोंड, कृषी अधिकारी वाघमोडे यांचेसह सर्व विभाग प्रमुख तसेच नाट्य परिषदेचे प्रशांत बडवे आदींच्या उपस्थितीत या दमदार कार्यक्रमास सुरूवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी केले.
कन्नड व मराठी, हिंदी गीतांवर जल्लोष
कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्या मै हू डाॅन या गीतावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची पावले थिरकली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या आरंभ प्रचंड है व कार्यकारी अधिकारी नरेंद्र खराडे यांच्या मेरी स्वप्नो की राणी या गीतांच्या सादरीकरणावर कर्मचारी व सर्व विभाग प्रमुख यांची पाऊले थिरकली! सीईओचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने- देशमुख व संगीता राठोड यांच्या कन्नड युगलगीताने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सिद्धाराम बोरुटे यांच्या गीतावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेका धरला. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाने रात्री उशिरापर्यंत रंगत वाढविली. कामाचा ताण, बीपी, शुगरचे टेन्शन न घेता भान हरपून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कला सादर केली.
दुष्काळ पाणीटंचाईवर आसूड
सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नुसत मनोरंजनच केलं नाही तर सामाजिकतेचे भानही राखले. दुष्काळ, पाणीटंचाई, राजकारण, मुली वाचवा, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आसूड ओढले. मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगलेल्या बापाची कथा मोहोळचे प्रदिप गुंड यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून साकारली. त्यांच्या धीरगंभीर अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले. कवी प्रकाश काळे यांनी बेकारीमुळे तरुणाच्या अवस्थेचे वास्तव मांडले. काय पाहिजे? या एकपात्री अभियानयातून अविनाश गोडसे यांनी नव्याने आलेल्या झेडपी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. माळशिरस व बार्शी पंचायत समितीचे सादरीकरण लक्षवेधक ठरले. मुख्यालयाच्या टीमने राज आलं हे जोशपूर्ण गीत सादर केल्यावर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने सभागृह दणाणून गेले. संतोष कुलकर्णी यांच्या शक्तिमानच्या एन्ट्री ने व ओ नींद वो चैन मुझे लोटा दो चा या विनोदी गीताने सर्वांना हसवले. पाणीपुरवठा विभागाच्या टीमने ‘जल है तो कल है, शौचालयाचा वापर करा असा विविध उपक्रमाचा संदेश देत दमदार गीताचे सादरीकरण केले. या गीतावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, पाणी व स्वच्छता विभागाचे अमोल जाधव, सचिन जाधव यांनी दमदार अभिनय सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. बैठकीनिमित्त त्या मुंबईला गेल्या होत्या.