सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोमवार दिनांक 4 मार्च रोजी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. या सभेत आव्हाळे या नवीन वर्षाचे बजेट मांडणार आहेत. एक महिला अधिकारी म्हणून आव्हाळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी काय गिफ्ट देणार? याबाबत लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक दुसऱ्यांदा प्रशासक सादर करणार आहेत. यावेळेस नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना बजेट मांडण्याची संधी मिळाली आहे. या नव्या अंदाजपत्रकात काय तरतुदी असतील याची जिल्हावाशियांना उत्सुकता लागली आहे.सोलापूर जिल्हा परिषदेची उत्पन्नवाढ न होता घटच होत राहिली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न होणार याचा उहापोह या नवीन बजेटमध्ये असणार आहे. पदाधिकारी असताना अंदाजपत्रक मांडण्याचा अधिकार अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतींना असतो. पण गेले दोन वर्ष जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे.
नवीन बजेट मांडतानाच गतवर्षीच्या बजेट मधील शिल्लक रकमा कुणीकडे वळविल्या याबाबत दुरुस्ती अंदाजपत्रक मांडले जाणार आहे. त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यावर सर्व खात्यांचा आढावा मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी घेतला आहे. खरे तर दरवर्षी फेब्रुवारीअखेर झेडपीचे बजेट सादर होते. पण झेडपीच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे आठवडाभर बजेट लांबले आहे. सीईओ आव्हाळे यांच्या बजेटमध्ये महिला व बालकल्याण शिक्षण व आरोग्य विभागावर जास्त भर राहणार असल्याचे सांगण्यात आले. तरीपण उद्या प्रत्यक्षात सभागृहात बजेट सादर झाल्यानंतर आभाळे यांनी जिल्हा वाशी यांना कोणती गिफ्ट दिली हे स्पष्ट होणार आहे.