सोलापूर :मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानामध्ये पुणे विभागीयस्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तृतीय व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील श्री.बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय द्वितीय पुरस्कारासाठी मानकरी ठरली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
या पुरस्कार प्राप्त शाळांना मंगळवार ५ मार्च रोजी दु.१ वाजता मुंबई येथील टाटा थिएटर नॕशनल सेंटर फाॕर परफाॕर्मिंग आर्टस, (एन.सी.पी.ए.) नरीमन पाॕईंट येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित तसेच विधानसभेचे अध्यक्ष अॕड राहूल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आले.या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनाचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम व सामाजिक बांधिलकीचे उपक्रमांमध्ये शाळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.या अभियान स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून याबाबत शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे यांनी एका पत्रान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांना कळविण्यात आले आहे.या अभियानामध्ये पुणे विभागीय स्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तृतीय व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील श्री.बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय द्वितीय पुरस्कारासाठी पात्र ठरले आहे.
हे अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, तृप्ती अंधारे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, या अभियानाचे समन्वयक विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, गोदावरी राठोड यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी,गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण ),केंद्र प्रमुख, शिक्षक यांनी परिश्रम घेतले..या पुरस्काराबद्दल पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी अभिनंदन केले आहे.