सोलापूर : शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात जात असताना पोलिसांनी पकडले व याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शाळांमधील मुलांचे पोषण चांगल्या प्रकारे व्हावे या चांगल्या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या शालेय पोषण आहाराचा काळाबाजार कसा होतो? याचा पोलखोल करणारी मालिका लवकरच ‘सोलापूर समाचार” मध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोलापुरात जुना विडी घरकूल येथील राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालयातून दोन महाविद्यालयीन विद्यार्थी रिक्षातून शालेय पोषण आहाराचा तांदुळ, मुगदाळ पोते, मटकी पोते व २५ तेल पाकीट भरत असत असल्याची माहिती देणारा अज्ञात व्यक्तीचा कॉल पोलिसांना ११२ क्रमांकावर आला. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांनी रिक्षाच्या चालकाकडे चौकशी केली. धान्य यार्डात नेत असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून ही बाब उघडकीस आली. उघडकीस आलेला हा एक प्रकार आहे. पण शालेय पोषण आहाराची सर्रासपणे विक्री होते, अशी धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिकांच्या शाळांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराच्या काळाबाजारामध्ये कोण कोण सहभागी आहे? याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती हाती येत आहे. ठेकेदार ते जिल्हा परिषदेचे अधिकारी व संबंधित शाळांचे कर्मचारी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शालेय पोषण आहारामध्ये शाळेच्या मुलाच्या पोषणाऐवजी अधिकाऱ्यांचे ‘पोषण” मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या साखळीचा पोलखोल करणारा धक्कादायक पंचनामा ‘सोलापूर समाचार” मध्ये आम्ही वृत्त मालिकेद्वारे लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे तारखेकडे लक्ष ठेवा…