February 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आचारसंहितेच्या शक्यतेने झेडपीचे कामकाज सुट्टीदिवशी सुरू राहणार

सोलापूर: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेमुळे शनिवार दिनांक 16 मार्च रोजी सुटी असतानाही दुपारपर्यंत कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक लागणार अशी चर्चा गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी घाई सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी 11 मार्च रोजी कामाबाबत आढावा बैठक घेतली होती. यात बऱ्याच विभागाची अनेक कामे प्रलंबित असल्याचे दिसून आले होते.  त्यामुळे विभाग प्रमुखांना निवडणुकीपूर्वी ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेले आठवड्यावर जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. अशातच शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाची प्रेस होणार असल्याचे पत्र व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाची लगबग वाढली आहे. कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी व मार्चअखेर सर्व निधी खर्ची पडावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या सूचनेनुसार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या काळात जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू राहील असे परिपत्रक जारी केले आहे. या काळात प्रलंबित राहिलेल्या सर्व कामांचा निपटारा करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत काही अधिकारी कार्यालयात बसून कामकाज मार्गी लावताना दिसून आले.