सोलापूर : ऑफिसर्स क्लबच्या कामकाजाची ओरड कायम असून या प्रश्नी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले नसल्याचे दिसून येत आहे. कडाक्याचा उन्हाळा व पाण्याची टंचाई असताना शुक्रवारी जलतरण तलावातील पाणी काढण्यात आल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या ऑफिसर्स क्लबच्या कामकाजाबाबत गेल्या एक वर्षापासून गोंधळ सुरू आहे. यापूर्वी कोरोना महामारीच्या काळात डिपॉझिट असलेले सुमारे साडेतीन कोटी रुपये मेंटेनन्सच्या नावावर कोणतीही परवानगी न घेता खर्ची टाकण्यात आल्यामुळे महसूल मंत्रापर्यंत तक्रार केली होती. याबाबत चौकशीचे आदेश झालेले असतानाही हिशोबातील गोंधळ कायम आहे. ऑफिसर्स क्लबच्या व्यवस्थेसाठी नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत तक्रार असतानाही अजूनही त्याच कर्मचाऱ्यांना कामावर ठेवल्यामुळे सदस्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऑफिसर्स क्लबच्या कामकाजाची धर्मादाय आयुक्तकडे असलेल्या नोंदणीनुसार पद्धत ठरलेली असताना पदभार दुसऱ्यांकडे देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी सदर बझार पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असतानाही अजूनही गोंधळ कायम आहे. शुक्रवारी जलतरण तलावातील पाणी काढण्यात आले. तलावाचे मेंटेनेस करण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यासाठी वीस लाखांचा खर्चही दाखविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापुरात पाण्याची टंचाई असताना आणि उन्हाळ्यात तलाव रिकामा केल्यामुळे ऑफिसर्स क्लबचे सदस्य असलेल्या अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ऑफिसर्स क्लबच्या कामकाजाबाबत कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध