सोलापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी पुन्हा मनोज ठाकरे यांनी पदभार घेतला आहे. मार्च अखेरची धावपळ सुरू असतानाच मॅटचा आदेश आल्याने ठेकेदारांची धावपळ उडाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांची वर्षापूर्वी बदली झाली होती. त्यांच्या जागी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून गावडे यांनी पदभार घेतला होता. गावडे यांनी यापूर्वी पंढरपूर विभागातही काम केले आहे. या बदली विरोधात कार्यकारी अभियंता ठाकरे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. बऱ्याच काळानंतर मॅटने त्यांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांनी नुकताच पदभार घेतला आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता गावडे यांची नियुक्ती लटकली आहे. मार्चअखेर केलेल्या कामांची बिले मंजूर करण्याची घाई असताना पदभार बदलण्याचा कार्यक्रम झाल्याने ठेकेदारांची धावपळ उडाली आहे. आता नवीन अधिकाऱ्यांना अधिकार येईपर्यंत बिलांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. ठाकरे यांच्या कार्यकर्दीबद्दल चांगले बोलले जात असून त्यांना न्याय मिळाल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.
ऐन मार्च एंडमध्ये हा बदल झाल्याने सोलापुरात चर्चेचा विषय झाला आहे. गुरुने चेल्याची जागा घेतली होती मात्र चेल्यानेही गुरूला चांगलाच धडा शिकविला अशी चर्चा आता ठेकेदारात सुरू झाली आहे.