सोलापूर: उत्कृष्ट नियोजन, नवसाक्षरांना राज्यातील क्षेत्रीय अधिकारी आणि शाळांनी उपलब्ध करून दिलेले उत्साहवर्धक वातावरण, योजना शिक्षण संचालनालयासह राज्यातील अधिकाऱ्यांचे मागील आठवडाभरातील अहोरात्र परिश्रम, वर्षभरातील प्रारंभीच्या प्रतिकूल परिस्थितीनंतर डिसेंबरपासून असाक्षरांच्या नोंदणीत घेतलेली झेप आणि नवसाक्षर व त्यांच्या कुटुंबीयांनी शासन-प्रशासनाच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद यामुळे ‘उल्लास’ अभियानातील महाराष्ट्रात पहिल्यांदाच घेण्यात आलेली उल्लास परीक्षा संस्मरणीय ठरली. आजी आजोबा, बापे अन् बायांनी विद्यार्थीदशेचा प्रौढ वयात अनुभव घेत आनंदही लुटला! तब्बल साडेचार लाख नऊ साक्षरानी ही परीक्षा दिली. केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी १७ मार्च रोजी महाराष्ट्रात ३६ हजार परीक्षा केंद्रावर झाली.या परीक्षेत तब्बल ४ लाख ५६ हजार ७४८ नवसाक्षरांनी उपस्थिती नोंदवत उत्साहाने परीक्षा दिली. उल्लास ॲपवरील नोंदणीच्या ७४.०३% उपस्थिती होती. मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू,तमिळ, तेलगू, कन्नड, गुजराती आणि बंगाली या नऊ माध्यमातून परीक्षा घेण्यात आली.
नव्वदीच्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात राज्यभर केंद्राचे हे अभियान राज्याच्या मदतीने मागील वर्षापासून राज्यात सुरू आहे. आपली मुले-नातवंडे ज्या शाळेत शिकतात तिथेच परीक्षा देताना नवसाक्षरांच्या चेहऱ्यावर अत्यानंद दिसून येत होता. केंद्रावर ठिकठिकाणी नवसाक्षरांचे स्वागतही झाले. केंद्र शासनाने दखल घेतलेल्या आणि मागील वर्षभरात राज्यात साक्षरता प्रचारात प्रेरक ठरलेल्या बारामतीच्या सुशीला क्षीरसागर यांनी पनवेल जवळील शिवकर जि. प. शाळेत तर सातारच्या बबई मस्कर यांनी चिंचणीच्या जि प. शाळेत परीक्षा दिली. नव्वदी पार केलेले वृद्ध आजी आजोबा अनेक केंद्रावर परीक्षा देताना दिसून आले. परीक्षेत महिलांची उपस्थिती अधिक होती.
यापूर्वी जाहीर केल्यानुसार या परीक्षेच्या पेपर मधील वाचन, लेखन व संख्याज्ञान या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५०पैकी १७ गुणांच्या उत्तीर्णतेची अट देण्यात आली होती. तर एकूण १५० पैकी ५१ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक असल्याचे कळविण्यात आले होते. आता केंद्राच्या सुधारित निकषानुसार या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १६.५ गुण तर एकूण १५१ पैकी ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक असल्याचे योजना शिक्षण संचालक यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना परीक्षा संपताच कळवले आहे. त्यामुळे सुधारित निकषानुसारच उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर होणार आहे. या निकषाइतके व त्याहून अधिक गुण प्राप्त झाल्यास अशा नवसाक्षरास साक्षरतेचे उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तर या निकषानुसार गुण प्राप्त न झाल्यास अशा परीक्षार्थीस अनुत्तीर्ण ऐवजी ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा गुणपत्रकावर देण्यात येणार आहे. नापास असा नकारार्थी शेरा कोणालाही देण्यात येणार नाही. सुधारणा आवश्यक असलेल्या नवसाक्षरांची उजळणी व सराव त्यांचे कुटुंबीय तसेच स्वयंसेवी शिक्षकांनी पुढे चालू ठेवायचा आहे.
मागील डिसेंबर पासून झेप..!
सन २०२२-२३ मध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी विविध कारणामुळे राज्यात झाली नव्हती. सन २०२३-२४ मध्ये प्रारंभीच्या काळात विविध शिक्षक संघटनांनी घातलेल्या बहिष्कारामुळे या अभियानाचे काम मंदावले होते. त्यानंतर डिसेंबर पासून योजना शिक्षण संचालनालयाचे अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या समन्वयामुळे मोठी झेप घेत आज अखेर ६ लक्ष ५७ हजार एवढ्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्र शासनाच्या उल्लास ॲपवर झालेली आहे. तर परीक्षेपूर्वी साधारणतः ६ लक्ष १७ हजार इतक्या असाक्षरांची नोंद झाली होती.
केंद्र शासनाचे दोन निरीक्षक महाराष्ट्रात या परीक्षेसाठी आले होते. अवर सचिव प्रदीप हेडावू यांनी पुणे येथे ३शहरी व ४ ग्रामीण परीक्षा केंद्रावर तसेच योजना संचालनालयास भेट दिली. तर सिद्धांत सिंग यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दोन शहरी व तीन ग्रामीण केंद्रांवर भेटी दिल्या.
परीक्षेला बसण्यासाठी उल्लास ॲपवरील नोंदणी आवश्यक होती. परीक्षेदिवशी परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालकांनी परीक्षा फॉर्म भरून घेतले. उपस्थितांना परीक्षा क्रमांक देऊन सकाळी १० ते सायं ५ या वेळेत परीक्षा घ्यायची होती. त्यामुळे गैरहजर कोणीही नाही. या परीक्षेत गैरहजर व नापास या संकल्पना नाहीत.
-राजेश क्षीरसागर,
शिक्षण उपसंचालक (योजना)
हे अभियान सन २०२७ पर्यंत चालणार आहे, त्यामुळे राज्यातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आत्ताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही त्यांनी येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येईल.
-डॉ. महेश पालकर.
शिक्षण संचालक (योजना)
जिल्हानिहाय उपस्थिती पुढीलप्रमाणे-
मुंबई शहर १८०३,मुंबई उपनगर ८६१२, ठाणे १५१५५,पालघर १३२९८, रायगड ७९०२, पुणे ९०४४, अहमदनगर ८३९४,सोलापूर १७५७१, नाशिक २४८३१, धुळे १०२७१, नंदुरबार १६१८३, जळगाव ४१९७५, कोल्हापूर २२५०, सातारा ४२१०, सांगली ७३४३, रत्नागिरी १३३४१, सिंधुदुर्ग २२३, छत्रपती संभाजीनगर १५५९६,परभणी १४२२७, बीड ११९३०, जालना १४२३२, हिंगोली ८७९४,नांदेड१८३९३, धाराशिव ४२२०,लातूर ३५५३, अमरावती २४६५२, अकोला १८८८१,बुलढाणा ५२३३, यवतमाळ १२९२३, वाशिम १४०२५,वर्धा १३६७, नागपूर ७२००, भंडारा ८२६२, गोंदिया ८५०२, चंद्रपूर २८६७६, गडचिरोली ३३८७६,
महाराष्ट्र एकूण ४लक्ष ५६ हजार ७४८.