February 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

“या’ दिवशी होणार सोलापूर झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षची निवड

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक शांततेत पार पडली. जिल्हा परिषदेचे नवे कारभारी ठरले. आता सर्वांना वेध लागले आहेत झेडपीचा अध्यक्ष कोण होणार? सोलापूर झेडपीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची सत्ता येणार असल्यामुळे या विजयाचे शिल्पकार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेला भेट देण्यासाठी निघाले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड कधी होणार याबाबत आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांना विशेष सभा घेऊन जिल्हा परिषदेत आमंत्रित केले जाणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांच्यातर्फे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची तारीख कळविण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सभेची तयारी केली जाणार आहे, असे प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंगळवारी सकाळी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सभेच्या पुढील कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. प्रशासनातर्फे या विशेष सभेची तयारी केली जात आहे. या सभेत फक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष ची निवड होईल त्यानंतर जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांचे सभापती अध्यक्ष पुढील विशेष सभेद्वारे निवड करतील, अशी कायदेशीर प्रक्रिया आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदसाठी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी बार्शी तालुक्याचाही नंबर लागू शकतो. समाज कल्याण सभापतीसाठी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या सौभाग्यवती तर महिला व बालकल्याण सभापती पदासाठी करमाळ्याच्या रश्मी बागल यांच्या नावाची चर्चा आहे. अर्थ व बांधकाम सभापतीपद भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजीत पवार यांना मिळू शकते. या सर्व घडामोडी च पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेला भेट देणार आहेत.