सोलापूर : सोलापुरात यंदाच्या मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. मागील आठवड्यातही तापमान 42 अंशापर्यंत गेले होते. कडाक्याच्या उन्हातही पाणी टंचाईवर मात करीत नैसर्गिक कोरड्या रंगाची उधळण करीत रंगपंचमीचा सण आनंदाने साजरा करण्यात आला.
सोलापुरात शनिवारी रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून आला. दुष्काळाच्या झळा जाणू लागल्या आहेत पाणीटंचाईने सर्वत्र लोकांना हैराण केले आहे सोलापुरातही पाच दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक कोरड्या रंगाची उधळण करीत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केल्याचे दिसून आले. रासायनिक रंगाचे दुष्परिणाम दिसून येत असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार नैसर्गिक कोरडे रंग वापरलेला नागरिक व बालगोपाळांनी मोठी पसंती दिल्याचे दिसून आले. पाण्याची नासाडी टाळत कोरडा रंग एकमेकाला लावून रंगपंचमीचा आनंद नागरिकांनी लुटला.
यंदा मार्च महिन्यातच सूर्यनारायणाचा रुद्रावतार पहावयास मिळत आहे. गेले आठवडाभर सोलापूरचे तापमान 40 ते 41 अंशाच्या दरम्यान राहिले आहे त्यामुळे दुपारी बारा वाजे नंतर उन्हाचा कडाका जाणवत असल्याने रस्ते निर्मनुष्य होताना दिसून येत आहे. शनिवारी हवामान खात्याकडे 41.4 अंश तापमानाचे नोंद झाल्याचे सांगण्यात आले यंदाच्या मार्च महिन्यातील हे तापमान सर्वाधिक आहे. एप्रिल व मे महिन्यातील सोलापूरची परिस्थिती काय असेल? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. ग्रामीण भागात विहिरीने तळ गाठला आहे तर बोअर उचक्या मारू लागल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. तापमान वाढल्याने दुपारनंतर वावटळ व काही ठिकाणी ढगाळी हवामानाची परिस्थिती दिसून आली. हवामान विभागाने 28 मार्चनंतर अशी स्थिती दिसून येईल असा अंदाज वर्तवला होता.त्याप्रमाणे काही ठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात येत आहे. पाणी टंचाईची अशी परिस्थिती असली तरी भाजीपाल्याचे दर मात्र कोसळल्याचे दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटो बांधावर फेकणे पसंत केले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापू लागला आहे. इतक्या कडाक्याच्या उन्हात उमेदवाराचा घाम फुटणार, हे मात्र आता निश्चित आहे.
कॉंग्रेसने खेळली कोरडी रंगपंचमी
सोलापूर शहरात रंगपंचमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सध्या शहर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असून भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची वणवण होत आहे. शहर ग्रामीण भागात पिण्यास पाणी मिळत नसल्यामुळे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने आमदार प्रणिताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसभवन येथे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कोरडी रंगपंचमी साजरा केली. यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे,शरद गुमटे,सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे,महेंद्र शिंदे, विवेक इंगळे,आशुतोष वाले, सुरज शिंदे,मनोहर चकोलेकर,अमित लोंढे,सोमनाथ होनराव, दिनेश डोंगरे, सचिन गायकवाड, चंद्रकांत नाईक उपस्थित होते.