सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अट्टल गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून 5 लाख 17 हजार 659 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्हेगाराकडून पोलिसांनी 122.5 ग्रॅम सोने, 33.5 तोळ्याचे चांदीचे दागिने, काळवीटाची 10 शिंगे, 4 जाळे, 1 बनावट पिस्टल, 2 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये अटक
लक्ष्मण चन्नप्पा पुजारी (रा. चिंचोळी, ता. अक्कलकोट) आणि सिध्या झिझिंग्या पवार (रा. कलकर्जाळ, ता. अक्कलकोट) या दोन अट्टल गुन्हेगाराचे समावेश आहे. दोन्ही आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे चौकात लक्ष्मण पुजारी यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे पॅन्टीत खवलेले 1 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली. त्याचकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे पिस्टल व काडतसे सिध्या पवार (रा. कलकर्जाळ) याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले. त्यामुळे याबाबत पोलिसांनी मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून लक्ष्मण पुजारी यास अटक केली.लक्ष्मण पुजारी यास पिस्टल व काडतुसेे देणारा तसेच घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यातील संशयित आरोपी सिध्या झिझिंग्या पवार हा तेरामैल चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेरामैल चौकात सापळा लावून सिध्या पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मंद्रुप पोलिस ठाण्यातील 2, मंगळवेढा पोलिस ठाण्यातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून 122.5 ग्रॅम सोने, 33.5 तोळ्याचे चांदीचे दागिने जप्त केले.
पोलिसांनी सिध्या पवार याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून हरिण किंवा काळवीट या वन्य प्राण्याची 10 शिंगे व जंगली प्राणी पकडण्यासाठी लागणारी 4 जाळी हस्तगत केली. पोलिसांनी सिध्या पवार याला मंद्रुप पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात अटक केली असून या गुन्ह्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 9 हे कलम वाढविण्यात आलेले आहे. या गुन्ह्याचा पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतत्वाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलिस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर, रविराज कांबळे, राजू डांगे, राजेश गायकवाड, सहायक फौजदार महंमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, हवालदार परशुराम शिंदे, धनाजी गाडे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, पोलिस शिपाई अन्वर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, यश देदेवकाते, समीर शेख, सतीश कापरे यांनी केली.