सोलापूर : एप्रिल महिन्यात अंगाची लाही लाही करणारे तापमान 43 अंशापर्यंत गेले असतानाच गुढीपाडव्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोलापुरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
सोलापुरात गेल्या आठवड्यात तापमान 43.4 अंशापर्यंत गेले होते. दररोज सरासरी 42 अंशावर तापमान जात आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा कडाका जाणवायला सुरुवात होत आहे. उष्णतेची लाट आल्याने महाराष्ट्रात सोमवारपासून अवकाळी पावसाची हजेरी लागेल असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे. सोलापुरात सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले व त्यानंतर पावसाच्या जोरदार धारा कोसळल्या. रात्री साडेआठ वाजता होनमुर्गी ते वडकबाळ दरम्यान जोरदार वादळी वारे सुटले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.सुमारे पंधरा मिनिट जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे महामार्गावरून दुचाकीवर जाणाऱ्यांची धांदल उडाली. हत्तुर उड्डाणपुलाखाली बऱ्याच जणांनी आश्रय घेतला. हत्तुर ते सोरेगाव दरम्यान जोरदार पाऊस झाला आहे. सोरेगाव ते सैफुलदरम्यान मात्र अजिबात पाऊस झालेला नाही. इकडे दक्षिण सोलापूर भंडारकोटे परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. जोरदार वादळी वारे सुटल्यानंतर ढग भरून आले व पावसाला सुरुवात झाली. विजाचा चमचमाट जाणवला. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्यांना या पावसाने दिलासा दिला. तापलेल्या जमिनीवर पाऊस पडल्याने असह्य उकडा जाणवू लागला आहे. आणखी दोन दिवस पावसाचे असतील असे हवामान विभागाने म्हटले आहे. अशात जोरदार पाऊस झाला तर वाढत्या तापमानात लोकांना दिलासा मिळणार आहे.