सोलापूर : सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवार व वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती.
या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, अमर पाटील, केदार उंबरजे, अशोक पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, सिध्दाराम चाकोते, शंकर पाटील, रामदास फताटे, अनिल सिंदगी, हरिष पाटील, रमेश बावी, पशुपती माशाळ, सकलेश बाभूळगावकर, बिपिन करजोळे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, राजशेखर म्हमाणे, यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी सह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी काडादी यांच्या बैठकीचा योग जुळवून आणला. प्रास्ताविकात त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी काडादी म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांच्या अंगात धमक आहे, चिमणी पाडल्यानंतर लगेच त्या साखर कारखाना स्थळावर येऊन त्यांनी पाहणी केली. सर्व कामगारांना धीर दिला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सिद्धेश्वर कारखान्याचे सभासद आहेत मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात सभासदांचे घेणार आहे. त्या बैठकीत मी सभासदांना आवाहन करणार आहे की, ज्यांनी मला त्रास दिला, कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले अशा भाजपला चारी मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा. प्रणिती शिंदे यांनी सभागृहात सुद्धा आपल्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडून धारेवर धरले होते, सुशीलकुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी ही वीरशैव कक्कय्या समाजाचा आहे आणि काडादी यांनी धाडस करुन उघड उघड मिटींग घेऊन पाठींबा दिल्याबद्दल मी त्यांचे जाहिर आभार मानतो. प्रणितीताई जिद्दी आहे, काम करते, जात पात बघत नाही, तिला साथ द्या असे शिंदे म्हणाले.