सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपतर्फे निवडणूक लढविणारे आमदार राम सातपुते यांच्याकडे बुलेट, पिस्तूल आहे तर माढा लोकसभेसाठी भाजपतर्फे निवडणूक लढविणारे खासदार रणजीतसिंह नाईक यांच्याकडे ब्रँडेड कार, रोकड, दागिने, शेतजमिनीसह मोठी गुंतवणूक तर महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे धैर्यशील मोहिते- पाटील यांच्याकडे बुलेट, सफारी, थार, स्कॉर्पिओ यासह शेतजमीन व सोन्याचे मोठ्या प्रमाणावर दागिने आहेत.
सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते तर माढा लोकसभेसाठी खासदार रणजीतसिंह नाईक, धैर्यशील मोहिते- पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली वैयक्तिक चल, अचल संपत्तीविषयी माहिती प्रतिज्ञापत्रासह जोडली आहे. सातपुते यांनी 26 पानी प्रतिज्ञापत्रात स्वतःकडे 65 तर पत्नीकडे 57 हजाराची रोकड असल्याचे नमूद केले आहे. स्वतःच्या नावे बुलेट मोटरसायकल तर पत्नीच्या नावे स्कूटर अशी वाहने असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे परवाना पिस्तूल आहे. त्याचबरोबर माळशिरस परिसरातील जमिनीची माहिती दिली आहे. सातपुते यांच्याविरुद्ध आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. बाकी इतर स्थावर व जंगम मालमत्तेची मोठी माहिती त्यांच्याकडे नाही.
खासदार नाईक यांनी 26 पानी प्रतिज्ञापत्रात पत्नी जीजमाला मुले तारा राजे व इंदिरा राजे यांच्या नावे असलेली संपत्ती नमूद केली आहे त्यांच्याकडे 80 तर पत्नीकडे 75 आणि मुलांकडे 20 तोळ्याचे दागिने आहेत त्याचबरोबर एरटिगा, इनोव्हा, फॉर्च्यूनर, बोलोरो, मर्सिडीज बेंज अशा किमती कार आहेत. विविध बँकांमधील खाती व गुंतवणूक आणि कर्ज याची माहिती मोठी आहे. तसेच शेतजमीन, प्लॉटची त्यांच्याकडे मोठी माहिती आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी 22 पानी प्रतिज्ञापत्रात स्वतः व पत्नी शितल यांच्या नावे असलेल्या वाहनांची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे बुलेट, सफारी, टाटा मॅजिक, थार, स्कॉर्पिओ आणि चार टँकर यासारखी वाहने आहेत. धैर्यशील यांच्याकडे ६४ हजार, पत्नी शीतल यांच्याकडे 96 हजार तर मुलगी इशिता हिच्याकडे 53 हजार रोकड असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर धैर्यशील यांच्याकडे 724 ग्रॅम सोने, पत्नी शीतल यांच्याकडे 899 ग्राम सोन्याचे दागिने, ईशिता हिच्याकडे 212 ग्रॅमचे दागिने असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर शेती, घर आणि विविध बँकातील गुंतवणूक, कर्जाविषयी व दाखल असलेल्या गुन्ह्यांविषयी माहिती दिलेली आहे.