सोलापूरराजकीय

फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यात आज काय ठरलं?

सोलापूर, माढा लोकसभेची रणनीती अखेर ठरली

राजकुमार सारोळे

सोलापूर : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री तथा भाजपचे सर्वेसर्वा नेते देवेंद्र फडणवीस यांनी माढा व सोलापूर लोकसभेची रणनीती ठरवली आहे. सोलापूरचा दौरा आटोपल्यानंतर सोलापूरकडून पुणे महामार्गावरील सिंहगड येथील हेलिपॅडकडे जाताना त्यांच्या कारमध्ये कोण होते? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

माढा लोकसभेसाठी पुन्हा एकदा खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अकलूजच्या मोहिते- पाटलांनी बंडाचे अस्त्र बाहेर काढले आहे. भाजपचा त्याग करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी त्यांनी हाती घेतली आहे. मंगळवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यानंतर जाहीर सभा घेतली. ही सभा आटोपून हेलिपॅडकडे जाताना कारमध्ये त्यांनी माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे किंगमेकर नेते आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना आपल्या वाहनात बसवून महत्वपूर्ण विषयावर चर्चा केल्याची समजते. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गाडीचा चालक देखील सोबत न घेता गाडीचे सारथ्य पंढरपूरचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना करावयास लावले. उभयतामध्ये काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील रणनीती यावेळी ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माढ्यामध्ये बबनदादा तर सोलापूरमध्ये राजन पाटील महत्वाची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button