सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे राजकीय वातावरण गरम झालेले असताना उन्हाचा कडाखा देखील वाढला आहे. रविवारी एप्रिल महिन्यातील तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केले असताना आज सोलापुरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता होम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पण निसर्गाने ही आज आपले रूप बदलले असून ढगाळी हवामान निर्माण झाल्याने तापमान घसरण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोमवारी दि. 29 रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ होत आहे.होम मैदानावर मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले असून तब्बल ८० हजार खुर्च्या या मंडपात ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर होम मैदानापासून जवळच्या अंतरावर ठिकठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
या सभेसाठी नागरिकांना होम मैदानामध्ये मार्केट पोलीस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका, तुळजापूर रोडकडून वाहनातून येणाऱ्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी नागरिकांना उतरवून त्यांची वाहने जुनी मिल कंपाऊंड व मरीआई चौक येथील एक्जीबिशन ग्राउंड येथे लावावीत.अक्कलकोटकडून येणारी वाहने नागरिकांना सिव्हील चौक येथे नागरिकांना उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. होटगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड, पत्रकार भवन मोदी पोलीस चौकीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काऊट गाईड मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. तसेच नॉर्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील, असे प्रशासनाने कळवले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे मोदी यांच्या सभेसाठी भव्य शामियाना उभारण्यात आला असला तरी सोमवारी हवामानात बदल झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी सोलापुरात एप्रिल महिन्यातील सर्वाधिक म्हणजे 43.7°c तापमान नोंदवले गेले. तापमानाने हा रेकॉर्ड केला असला तरी आज सोमवारी मात्र वेगळी परिस्थिती दिसत आहे. ढगाळी हवामानाची परिस्थिती निर्माण झाली असून तापमानात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ