सोलापूर : सोलापूरकरहो यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो होतो पण आज मी काहीतरी मागण्यासाठी आलो आहे. पद्मशाली समाजाचं  मी मीठ खाल्लं आहे. त्यांचे उपकार मला फेडायचे आहेत,  असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरकरांना लोकसभेसाठी साद घातली.

सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज होम मैदानावर भव्य प्रचार सभा झाली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापुरात दोन वाजता आगमन झाले. सभास्थळी दोन वाजून 19 मिनिटांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘भारत माता की जय” असे म्हणत ‘माझ्या प्रिय सोलापूरकरांनो” अतिशय मनापासून मी तुम्हाला नमस्कार करतो. ‘जय जय राम कृष्ण हरी” अशी त्यांनी मराठीतून सुरुवात करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो. भगवान विठ्ठल, जगद्गुरु बसवेश्वर यांची व महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीला मी नमन करतो, अशी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. माझ्या सभेला सोलापुरात मिळालेला हा प्रतिसाद पाहता ‘फिर एक बार मोदी सरकार” हे स्पष्टपणे दिसत आहे, असे मोदी म्हणतात उपस्थित यांनी एकच जयघोष केला. सोलापूरकरांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. मी या वर्षात दुसऱ्यांदा तुमच्यासमोर आलो आहे. जानेवारीमध्ये तुमचा हक्क पुरा करण्यासाठी काही देण्यासाठी मी आलो होतो पण आज मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलो आहे. आतापर्यंत तुम्ही मला भरभरून दिले आहे पण आज मला तुमचा आशीर्वाद हवा आहे.  तुमचा विकास करण्याची माझी गारंटी आहे.

आपल्या भाषणात मोदी यांनी विरोधकावर हल्ला चढवला. संविधान बदलणार, आरक्षण हटवणार असा विरोधक खोटा प्रचार करत आहेत. पण गेल्या दहा वर्षातील माझा कारभार पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की एससी, एसटी व ओबीसी समाजासाठी आम्ही खूप काही केले आहे. आमच्या मंत्रिमंडळातील 60 टक्के मंत्री या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. सर्व समाजाला न्याय देण्यासाठी व सर्व योजना सर्वांसाठी हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. कर्नाटकात असाच प्रचार करून काँग्रेसची मंडळी सत्तेवर आली व विशिष्ट मायनॉरिटी ना आरक्षण देण्याचा त्यांनी का घाट घातला आहे पण मी हे होऊ देणार नाही.  गेल्या साठ वर्षात काँग्रेसने मागासलेल्यांना पुढे आणण्यास चे काम केलेच नाही केवळ यावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा त्यांचा उद्देश आहे. आता या निवडणुकीत विरोधकांकडे विकासाचा काहीच मुद्दा नाही. दररोज मोदी यांना शिव्या देण्याचे ते काम करीत आहेत. पंतप्रधान कोण हे इंडिया आघाडीकडे स्पष्ट नाही. पाच वर्षात पाच पंतप्रधान असा त्यांचा अजेंडा आहे. मोदी सरकार समाज जोडण्याचे काम करीत आहे. देशाला विकासाकडे नेण्यासाठी व माझे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राम सातपुते यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

पंढरपूर रेल्वेचा उल्लेख…

काँग्रेसने 23 वर्ष पंढरपूर रेल्वे चा प्रश्न भिजत ठेवला पण मोदी सरकार सत्तेवर आल्यावर निधी मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावला पुणे हैदराबाद महामार्गाचे काम तडीस नेले पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या भक्तिमार्गांना जोडण्यासाठी नवे रस्ते मंजूर केले, सोलापूरला वंदे भारत एक्सप्रेस ही नवीन गाडी दिली. सोलापूरकरांचे उरलेले प्रश्न सोडवण्यासाठी मोदीचे हात बळकट करा असे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सरकार लोकांसाठी काम करत आहे असा गौरवपूर्ण उल्लेख ही त्यांनी यावेळी केला.

पद्मशाली समाजाची आठवण…

आपल्या 31 मिनिटाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ‘भाईओ” अशा शब्दात सर्वांना साद घातली. अहमदाबादमधील मिल मजदूर ज्यावेळी मला आठवतात त्यावेळी पद्मशाली समाजाची मला आठवण येते. पद्मशाली समाजाने मला खाऊ घातले आहे. त्यामुळे त्यांच्या मिठाचे उपकार मला फेडायचे आहेत,  अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *