सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराचा आणखी गोंधळ वाढला आहे. करमाळा आरोग्य विभागाने तक्रारदारांनाच नोटीसा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेने करमाळा तालुका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याबाबत 19 एप्रिल रोजी आरोग्य विभागाला पत्र दिले होते. पण हे पत्र आरोग्य विभागाच्या प्रशासन विभागातच पडून होते. अक्कलकोट तालुक्यातील गोंधळ पुढे आल्यानंतर ‘सोलापूर समाचार” ने आरोग्य सेवा संघटनेने केलेल्या तक्रारीकडे लक्ष वेधले होते. सीईओ आव्हाळे यांच्याकडे हे पत्र दिल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. 29 एप्रिल रोजी आरोग्य विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याने करमाळा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना या पत्रबाबत विचारणा केल्यावर करमाळा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तक्रारीबाबत नोटीस बजावल्या आहेत व पुरावे सादर करण्याबाबत सूचित केले आहे. कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर दहा दिवस करमाळा आरोग्य विभाग काय करत होता? असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच आरोग्य सेवा कर्मचारी संघटना या उलट्या न्याय बाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान करमाळा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रारदार कर्मचाऱ्यांना हे पत्र कोणाच्या सांगण्यावरून काढले असे आता आरोग्य विभागात चर्चा रंगली आहे आरोग्य विभागातील गोंधळाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी लक्ष घातल्यानंतर अधिकाऱ्यांचे भंबेरी उडाली आहे एकमेकांना वाचविण्याच्या नादात गोंधळाची स्थिती निर्माण करण्यात येत आहे सीईओ आव्हाळे यांच्या दहा मे रोजीच्या आढावा बैठकीत चुका करणाऱ्यांचे खरडपट्टी केली जाईल असा इशारा दिल्याने हा गोंधळ आणखी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.