March 9, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मंद्रूप पोलीस ठाण्यात तहानलेल्या पक्षांसाठी सुरू केली पाणपोई

सोलापूर: मंद्रूप पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्याहस्ते उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची सोय व्हावी यासाठी झाडांवर “पक्षी-जलपात्र” बांधण्यात आले.

यावेळी पक्षी-पात्र उपक्रमा संदर्भात बोलताना संकेत देवळेकर म्हणाले की “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात सांगितल्याप्रमाणे जे निसर्गातील वृक्ष, वेली आणि पक्षी, प्राणी आपले सवंगडी आहेत असे आपण मानले पाहिजे, हे सर्व निसर्गाशी असलेले आपले अतूट नाते दर्शवतात. माणूस आणि निसर्ग यांच्यातील स्नेहभाव परस्परावलंबित्वाचे सुंदर चित्र या वाक्यातून दिसते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याशी जोडलेली आहे आणि आपल्यासाठी उपयुक्त आहे. वृक्षवल्ली म्हणजे झाडे आणि वेली, तर वनचरे म्हणजे जंगलातील पक्षी आणि प्राणी. झाडे माणसाला सावली,फळे,औषधे, लाकूड देतात आणि प्रदूषण दूर करतात. वन्य पक्षी, प्राणी जंगलातील समतोल राखतात. या सर्वामुळे पर्यावरण टिकून राहते. म्हणून हे सगळे निसर्गमित्र आपली सोयरे म्हणजे नातलगच आहेत. ही भावना मानवी स्वार्थापेक्षा खूप मोठी आहे. आजच्या काळात मानवाने निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. झाडांचे कत्तल, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. म्हणून माणसाने निसर्गाशी प्रेमाने वागले पाहिजे आणि त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण सर्वांनी निसर्गाला आपले नातेवाईक समजून त्याचे जतन केले पाहिजे. झाडे लावा, त्यांची काळजी घ्या, पक्षांवर आणि प्राण्यांवर प्रेम करा. निसर्ग वाचला तरच आपले जीवन सुरक्षित राहील. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” ही केवळ एक अभंगाची ओळ नसून ती आपल्याला निसर्गप्रेमाचे मूल्य शिकवणारी मार्गदर्शक ओळ आहे. बसवनगरचे पोलीस पाटील प्रविण राठोड यांनी पक्षी-जलपात्र  हा उपक्रम दरवर्षीच्या उन्हाळ्यात राबविला आहे. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.यावेळी मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, फौजदार राजू डांगे, प्रविण राठोड, पोलीस कर्मचारी व मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीतीले सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.