सोलापूर : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने जामगुंडी मंगल कार्यालय येथे सन 2025 मधील आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कारांचे थाटामाटात वितरण करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील 16 ग्रामीण प्रकल्पांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 16 अंगणवाडी पर्यवेक्षिका, 48 अंगणवाडी सेविका व 48 मदतनिस यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिस या बालकांच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी कर्मचारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्यामुळे शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच यावेळी बोलताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी, सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत लेक लाडकी योजना, एकल महिला सर्वेक्षण, प्रधानमंत्री मातृवंदन योजना तसेच आदिशक्ती योजना यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असलेबाबत सांगून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका या अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणे या योजनांची अंमलबजावणी करत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानिमित्त आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष संदेश देण्यात आला. महिलांचे सशक्तीकरण, समाजातील त्यांचे योगदान व नेतृत्व यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
“स्त्री ही शक्ती, प्रेरणा आणि परिवर्तनाची मूर्ती आहे.”
या प्रसंगी पुरस्कार प्राप्त अंगणवाडी कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रताप रुपनर, शिवानंद मगे, साहेबराव देशमुख, रेणुका प्रथमशेट्टी, साहेबराव देशमुख, पांचाळ, अमिता वसेकर, निर्मला कोरे यांनी परिश्रम घेतले.

More Stories
स्मशानभूमींच्या स्वच्छतेने मंद्रूपच्या युवकानी साजरी केली धुळवड
महापालिकेच्या राजकारणात पराभव तरीही नव्याना घेऊन व्यवसाय उभारणी
Rto मधील निवृत्त हेडक्लार्क हरवाळकर यांचा दुचाकी अपघातात मृत्यू