सोलापूर : करमाळा आरोग्य विभागातील भांडण अखेर एप्रिल महिनाअखेर मिटले व पुन्हा एक मे पासून हा वाद पेटला, अशी गत झेडपी आरोग्य विभागाची झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने करमाळा तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची 19 एप्रिल निवेदनाद्वारे तक्रार केली होती. अक्कलकोट येथील प्रकरणानंतर या तक्रारीबाबत गाजावाजा झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधीक्षकाने करमाळा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पुरावे सादर करण्याच्या नोटिसा बजावल्या. हा वाद विनाकारण वाढत असल्याचे दिसून आल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी प्रकरण सामोपचाराने मिटवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीस एप्रिल रोजी गटविकास अधिकारी मनोज राऊत, आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख यांच्या मध्यस्थीने संबंधित डॉक्टर व कर्मचारी यांच्यात समन्वय झाला. सर्वांनी सामोपचाराने तक्रारी मिटवून घेण्याचे ठरले.
पण एक मे पासून हा वाद पुन्हा सुरू झाला आहे. संबंधित डॉक्टरांनी लेखी काही देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आम्ही देखील लेखी देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा ग्रुपवर याबाबत वाद सुरू झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख यांनीही या वादाला पुष्टी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक अशा गंभीर प्रकरणात जिल्हा आरोग्य कार्यालयाकडून अतिरिक्त किंवा सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाठवून चौकशी करून अहवाल घेणे आवश्यक असताना वेळ मारून नेण्याच्या पद्धतीमुळे वाद वाढल्याचे दिसून येत आहे. मोहोळ येथील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ ठिकाणी पाठविणे आवश्यक असताना क्लीन चिट देण्यात आल्यामुळे वरिष्ठांना ‘खूश” केले की आपले काही होत नाही, अशी भावना वादग्रस्त कर्मचाऱ्यांची झाली असल्याने अशा तक्रारीत वाढ झाली आहे.
30 एप्रिल रोजी माझ्या उपस्थितीत हे प्रकरण समन्वयाने मिटले आहे. याबाबत मी वरिष्ठांना अहवाल पाठविला आहे. पुढे काय झाले माहित नाही. निवडणूक व पाणीटंचाईचे महत्त्वाचे प्रश्न माझ्यासमोर आहेत.
मनोज राऊत,
गटविकास अधिकारी, करमाळा