सोलापूर : सोलापूर झेडपीच्या मुख्यालयाचा लूक बदलण्यात येत आहे. जीर्ण झालेले सभागृह, विभाग प्रमुखांची कार्यालये व अंतर्गत रस्ते चकाचक करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या पुढाकारातून झेडपीच्या मुख्यालयाला कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा परिषदेची मुख्य इमारत दगडी बांधकामाची आहे. या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वाराचे चित्र यापूर्वी अल्युमिनियमचे रेलिंग देऊन बदलण्यात आले होते. या रेलिंगला बसवलेल्या निळ्या काचामुळे इमारतीच्या आत हवा येत नव्हती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या काचा काढण्याचा निर्णय घेतला व त्या ठिकाणी जाळीदार मोठी खिडकी बनवण्यात आल्यामुळे इमारतीमध्ये खेळती हवा सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाच्या कडक उन्हाळ्यातील असह्य उकाड्यापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी इमारतीअंतर्गत असलेल्या विभाग प्रमुखांची कार्यालये चकाचक करण्यास सुरुवात केली आहे. पदाधिकारी यांचे कार्यालय असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील पोर्चमधील फरश्या निखळल्या होत्या. त्या फरश्या नव्याने बसविण्यात येत आहेत. त्यानंतर मुख्य सभागृहाच्या फर्निचरला मोठ्या प्रमाणावर वाळवी लागली होती. आता हे फर्निचर काढून नव्याने सभागृहाला लूक देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर अंतर्गत सिमेंटचे रस्तेही चकाचक करण्यात येणार आहेत. सेसफंडातून सुमारे दीड कोटीची हे कामे होणार आहेत.
ग्रामीण भागाच्या विकासाचे अंग म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. त्यामुळे मिनी मंत्रालयाची इमारत व आतील कार्यालय देखणी असावीत. येणाऱ्या- जाणाऱ्यांना झेडपीचा अभिमान वाटावा असा लुक इमारतीला देण्याचा प्रयत्न आहे.
मनीषा आव्हाळे,
प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी