सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदानाच्या वेळी अनेक राजकीय किस्से घडले आहेत.  आता या किश्यांची कट्ट्यावर चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात माजी महापौर मनोहर सपाटे व मनपाचे माजी स्थायी समिती सभापती संजय कोळी व राजकुमार पाटील यांच्यात झालेल्या संवादाची चर्चा रंगली आहे.

सलग तिसऱ्या वेळेस सोलापूर लोकसभा निवडणूक चुरशीची झाली आहे. याही निवडणुकीत मोदी लाट दिसून येत असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आमदार विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 60000 चा लीड देणार, असा दावा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती संजय कोळी यांनी केला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला पोलिंग एजंटही मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काडादी हायस्कूलच्या बुथवर मंगळवारी दुपारी शरद पवार गटाचे माजी महापौर मनोहर सपाटे पाहणीसाठी आले. त्यावेळी तेथे माजी नगरसेविका लता फुटाणे याही उपस्थित होत्या. तेथील वातावरण पाहून सपाटे यांनी मिस्कीलपणे संजय कोळी यांना सवाल केला, ‘अरे आम्हाला काहीतरी ठेवा”. यावर सर्व कार्यकर्ते खळखळून हसले. असाच किस्सा जय भवानी प्रशालेच्या बुथवर राजकुमार पाटील यांनी भेटल्यावर घडल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार गट, शिवसेना सोबत असल्याने या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा लीड तुटणे अशक्य असल्याचे कोळी यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *