March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर लोकसभेची पोस्टल मतदानाची आली आकडेवारी

सोलापूर  : सोलापूर लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात भोसे , नंदेश्वर , लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी , सजावट, मतदारांचे स्वागत करणे , मतदान खोलीपर्यंत मतदारांना पोहचविणे आदी कामांमध्ये मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी लोकशाही उत्सवाच्या कामांमध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये युवकांनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात 3 हजार 154 इतके टपाली मतदान झाल्याची माहिती नोडल अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

सोलापूर लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवेढा तालुक्यात भोसे , नंदेश्वर , लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांना आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये सुरू आहे हे समजण्यामध्ये अडचण व गोंधळ होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली होती.या मतदान केंद्रावर दिशादर्शक फलक तयार केले होते आणि मतदारांना प्रत्यक्ष मतदान खोलीपर्यंत पोहचविण्यासाठी मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांना स्वयंसेवक म्हणून मदतीला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.आणि या कामामध्येही विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.
या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी निळा , हिरवा , पांढरा , गुलाबी अशा रंगाचे टी शर्ट घातले होते.या केंद्रावरील मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी , सजावट, मतदारांचे स्वागत करणे या कामामध्ये चांगली मदत केली.सदर कामांमध्ये मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.लोकशाही उत्सवाच्या कामामध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये भावी पिढी असणाऱ्या युवक व युवतींनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले.विशेषतः मतदान केंद्रावरील वयस्कर , अपंग , निरक्षर , रुग्ण आदी मतदारांना त्यांची मतदार स्लिप बघून केंद्रातील खोलीकडे पोहच करण्याची व्यवस्थेसाठी चांगली मदत झाली.यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव ,नायब तहसीलदार ( निवडणूक ) जयश्री स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी डी.एस.इंगोले , पुरवठा अधिकारी हणमंत पाटील ,तलाठी दिनेश सोनवणे , कोतवाल जरग यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न केले तसेच मतदान केंद्रावर मतदारांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर  लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेले घरभेटी दरम्यानचे आणि अधिकारी/ कर्मचारी यांनी केलेले टपाली मतदानाची एकत्रित माहिती:-
वय वर्षे 85 पुढील मतदार यांचे घर भेटीदरम्यान झालेले एकूण मतदान-1222.
अपंग मतदार यांचे घर भेटीदरम्यान झालेले एकूण मतदान-124.
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांनी केलेले एकूण टपाली मतदान-469.
इतर 10 लोकसभा मतदारसंघाकडून प्राप्त झालेल्या एकूण टपाली मतपत्रिका-914.
भारतीय सैन्य दलातील अधिकारी /सैनिक यांचेकडून टपालाने आजमिती पर्यंत प्राप्त झालेल्या एकूण टपाली मतपत्रिका-425.
एकूण झालेले टपाली मतदानाची संख्या- 3154.