सोलापूर : लोकसभा निवडणुकीत बीडचे ‘पार्सल” हा मुद्दा कळीचा ठरला. पण काहीही असले तरी बीडच्या ‘पार्सल”ची झेडपीच्या अधिकाऱ्यांना मोठी धास्तीच असल्याचे दिसून आले आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रचारावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बीडचे ‘पार्सल” परत पाठवा असा मुद्दा उचलून धरला होता. याला भाजपच्या नेत्यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिले होते. काहीही असो, मतदानानंतर प्रचारातील हा मुद्दा लोक विसरले असले तरी झेडपीत बीडहून येणाऱ्या एका ‘पार्सल”ची अधिकाऱ्यांना मोठी धास्ती असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी बीडहून हे पार्सल झेडपीच्या विविध विभागात कुरिअरमार्फत पोहोच झाले आणि अधिकाऱ्यांना उन्हाचा कडाका उतरला असतानाही घाम फुटल्याचे दिसून आले आहे. झेडपी अधिकाऱ्यांना येणारे बीडचे हे ‘पार्सल” नवीन नाही. या पार्सलमधून आलेल्या प्रत्येक कागदाचा दोन हजाराप्रमाणे हिशोब करावा लागतो असे एका कर्मचाऱ्याने सांगितल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. एकाच पार्सलमधून माहिती अधिकाराचे शंभर ते दीडशे अर्ज येतात हे ऐकून कोणालाही खरे वाटणार नाही. पण झेडपी तसेच विविध कार्यालयात बीडहून येणारे हे पार्सल फारच डोकेदुखी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बीडच्या ‘पार्सल” ची अशी नाहीतर तशी चर्चा तर होणारच. या ‘पार्सल” चा बंदोबस्त कसा करायचा याचीच चिंता अधिकाऱ्यांना लागून राहिली आहे.