सोलापूर : ‘चला हवा येऊ द्या” म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी झेडपीच्या मुख्य इमारतीच्या रेलिंगच्या काचा फोडण्यास लावल्यानंतर झेडपीत येणाऱ्या- जाणाऱ्यांनी चेष्टा केली होती पण सध्या इमारतीतील वातावरणाची स्थिती पाहून अधिकारी, कर्मचारी व येणारे – जाणारे लोकही सीईओ आव्हाळे यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करीत आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात सोलापूरचा पारा 44 अंशापर्यंत गेला. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले. पंखा, कुलर व एसीचा आधार घेत हा उकाडा सुसह्य करण्याचा प्रयत्न झाला. पण बत्ती गुल झाल्यावर मात्र नागरिकाच्या अंगाची लाही- लाही झाली. सोलापूर झेडपीतील अधिकारी व कर्मचारी हा त्रास गेल्या अनेक वर्षापासून सहन करीत होते. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतील कोंदट वातावरणाची परिस्थिती लक्षात आली.  त्यामुळे त्यांनी इमारतीत काही बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःचे कार्यालय बाजूच्या कक्षात स्थलांतरित केले व त्यानंतर इमारतीच्या मुख्य दर्शनी भागावर यापूर्वी अल्युमिनियमचे रेलिंग लावून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या निळ्या काचा हटविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या काचांमुळे इमारतीच्या आत हवाच येत नसल्याचे दिसून आले होते.  काचा फोडण्याचे काम सुरू झाल्यावर इतका खर्च वायफळ जाणार म्हणून अनेकांनी ‘चला हवा येऊ द्या” अशी टीका सुरू होती.

आता या काचा काढून त्या ठिकाणी जाळीदार खिडक्या बसविण्याचे काम करण्यात आले आहे.  त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यमारतीच्या सौंदर्यात कोणतीही बाधा आलेले नाही. विशेष म्हणजे या खिडक्यातून इमारतीच्या आत हवा येऊ लागल्यामुळे आतील वातावरणात बदल झाला आहे यंदाच्या कडक उन्हाळ्यातही इमारतीच्या आतील भागात मोकळी हवा मिळाली.  त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला.  बत्ती गुल झाली तरीही उकाड्याचा त्रास कर्मचाऱ्यांना जाणवला नाही.  कार्यालयात आतपर्यंत मोकळी हवा येत राहिल्याने कक्षामध्ये बऱ्याच काळापासून साचून राहिलेला विशिष्ट वासाचा दर्पही नाहीसा झाला तसेच आता या कार्यालयांमध्ये प्रकाश भरपूर येत असल्यामुळे दिवे लावण्याची गरज भासत नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे पाठीमागील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रेलिंगच्या काचा फोडून श्वास मोकळा करावा अशी विनंती केली होती. तेही काम पूर्ण करून घेण्यात येत असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता मोकळ्या वातावरणात काम करणे सोपे झाले आहे.

त्याचबरोबर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पोर्चमधील फरशानी निखळल्या होत्या. हे काम करून घेण्यात येत असल्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्यांचा त्रास कमी झाला आहे. जिल्हा परिषदेचे सभागृह व आतील कक्षांचेही नूतनीकरण करण्यात येत असल्यामुळे इमारतीच्या सौंदर्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहेत.

एसीचा मला त्रास होतो. त्यामुळे खिडक्या उघडून पंखा लावत असे. पण हवा येत नसल्याने प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. आता पुढील रेलिंगच्या काचा फोडून खिडक्या बसविल्याने कार्यालयात मोकळी हवा येत आहे.

अमोल जाधव,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,

पाणी व स्वच्छता विभाग

 

सभापतींच्या कार्यालयात आमचे कामकाज तात्पुरते शिफ्ट करण्यात आले आहे.  आधी काहीच हवा येत नव्हती पण आता काचा काढल्यानंतर आमच्याही कार्यालयात पोर्चमधून हवा येत आहे. त्यामुळे कामकाज करणे सोपे झाले आहे.

अश्विनी सातपुते,

वित्त विभाग

आमचे कार्यालय पाठीमागे असल्यामुळे इमारतीच्या पुढील भागातून हवा आत येत नव्हतीच.  पण आता काचा काढल्यामुळे आमच्याही कार्यालयात मोकळी हवा येत आहे. पोर्चमध्ये नव्याने फरशा बसविण्यात आल्यामुळे ये- जा करणे सोपे झाले आहे.

अविनाश गोडसे,

प्रशासनाधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *