सोलापूर : शाळांमधील परीक्षा केव्हाच संपल्या आहेत. आता तर परीक्षांचे निकाल हाती येत आहेत. पण जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे एक वेगळीच ‘टेस्ट” घेतली जात आहे. झेडपीतील पिण्याच्या पाण्याची ‘टेस्ट” घेण्यात आली असून सर्वच निकाल ‘फिट” आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्राची दोन प्रकारे ‘टेस्ट” घेतली जाते. केमिकल व बॅक्टेरियल अशी ही पिण्याच्या पाण्याची ‘टेस्ट” आहे. साथीचे आजार पसरू नयेत म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग दरवर्षी या काळात दक्ष असतो. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भेडसावते. या काळात ज्या स्तोत्रांमधून पिण्यासाठी पाणी नेले जाते, त्यास स्तोत्राची सतत ‘टेस्ट” केली जाते. अशा पाण्यातून आजार पसरू नयेत, यासाठी ही काळजी घेतली जाते. पावसाळा सुरू झाला की या पाण्याच्या स्तोत्रामध्ये जमिनीवरून वाहत जाणारे पाणी मिसळते. पिण्याच्या स्तोत्रात जर जमिनीवरुन वाहणारे दूषित पाणी मिसळले तर साथीचे आजार पसरण्याचा धोका संभवतो. गावा भोवतालीचे शौचालय, ड्रेनेज यामधून बॅक्टेरियांचा तर कारखान्यांमधून सोडलेल्या पाण्यातून रासायनिकांचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सतत ‘टेस्ट” करून याचे अहवाल आरोग्य विभागाला पाठविले जातात. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्या सूचनेनुसार या विभागांनी एक एप्रिल पासून पाण्याची ‘टेस्ट” सुरू केली आहे. यामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेतील सर्व विभागांमध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याची ‘टेस्ट” घेण्यात आली. यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा, पाणी व स्वच्छता, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य व माध्यमिक शिक्षण विभागातील फिल्टरमधून येणाऱ्या पाण्याची ‘टेस्ट” घेण्यात आली. यात सर्व विभागाचा अहवाल ‘फिट” आला आहे.
जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये जवळपास 4 हजार 101 पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र आहेत. या पाण्याची ‘टेस्ट” घेण्यात येत असून आतापर्यंत 60 टक्के काम झाले आहे. यात 1 हजार 942 केमिकल तर 2 हजार 494 स्तोत्रांची बॅक्टेरिया टेस्ट झाली आहे. अद्याप कोठेही दूषित पाण्याचे नमुने आढळले नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी सांगितले. पाहण्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर तात्काळ आरोग्य विभागाला पाठविला जातो. आरोग्य विभागामार्फत त्या पाण्याची तपासणी करून पाणी पिण्यायोग्य असल्याचे ग्रामपंचायत विभागाला कळविले जाते व त्या पाण्यात जंतुनाशके टाकली जातात. पाण्यातून बरेच आजार बाळवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी ही खबरदारी घेतली जाते.