सोलापूर : शेतकरी बांधवानो सावधान.. पावसाळा तोंडावर आहे. तुमच्या गोधनाची काळजी घ्या. साथीच्या रोगापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या लाळ्या- खुरकत प्रतिबंधक लसीचा डोस द्या असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे दरवर्षी शेतकऱ्यांच्या पशूंचे साथींच्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी दोन वेळा लसीकरण मोहीम राबवली जाते. पावसाळा सुरू होण्याअगोदर व हिवाळा तोंडावर असताना ही लस जनावरांना दिली जाते. पावसाळा सुरू झाल्यावर पावसाच्या पाण्यातून या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच थंडीच्या दिवसात कडाक्याच्या थंडीने जनावरांना लाळ्या- खुरकत ची लागण होऊ शकते. एकदा का हे साथीचे रोग जनावरांमध्ये आले तर त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होते व या साथीच्या रोगांमुळे जनावरांना धोका संभवतो. त्यामुळे दरवर्षी शासन स्तरावर शेतकऱ्यांची दुभती जनावरे व बैलवर्गीय जनावरांसाठी म्हशीचा पुरवठा केला जातो शासनाकडून आलेल्या लसीनुसार जिल्ह्यात तालुकानिहाय पशुसंवर्धन दवाखान्यामार्फत लसीकरण सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घेतले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ पशुसंवर्धन दवाखान्याची संपर्क करून आपल्या जनावरांचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
असे झाले लसीकरण…
तालुका लसीकरण
अक्कलकोट. 53000
बार्शी. 82085
करमाळा. 91702
माढा. 107600
माळशिरस. 163416
मंगळवेढा. 87321
मोहोळ. 100400
पंढरपूर. 178395
सांगोला. 146335
उत्तर सोलापूर. 31581
दक्षिण सोलापूर. 59450