सोलापूर : मंद्रूप येथील युवकांनी धुळवडीच्या निमित्ताने हिंदू स्मशानभूमींची स्वच्छता करून विधायक कृतिशीलता जपली.
‘आम्ही मंद्रूपकर’ उपक्रमातील युवक स्वयंस्फूर्तीने यात सहभाग नोंदवला. मंद्रूप बसस्थानक शेजारच्या हिंदू स्मशानभूमीच्या दहनशेडमधील राख गोळा करून झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. काटेरी झाडी-झुडपांनी वेढलेली बसस्थानक परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांमध्ये स्वच्छ झाली. झाडून गोळा करण्यात आलेला दहा गाड्या कचरा गोळा करून खत निर्मिती प्रकल्पास पाठविण्यात आला.
मंगळवारी (दि.३) सकाळी ६:३० वाजता स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. तरुणांनी हातामध्ये खराटा घेऊन स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरवात केली. काहींनी काटेरी झुडपं तोडली. या उपक्रमात तासाभरात १५ ते २० युवक जोडले गेले. तसेच ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी सहभागी झाले. मुकेश खराडे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत-शिवारातुन तुरीच्या काड्या गोळा करून स्वत: खराटे तयार केले. विकास शिळ्ळे, जगन्नाथ खरात यांनी दहनशेडमधील राख झाडांभोवती टाकून शेडची स्वच्छता केली. सिद्धेश्वर नंदुरे, सचिन साठे यांनी दहन शेडची स्वच्छता केली. परिसर झाडून स्वच्छ केला. रवी केवटे यांनी अंत्यस्कारासाठी वापरलेल्या बांबूचा झाडांना आधार दिला. श्याम गोसावी, अक्षय झेंडेकर, नितीन खराडे यांनी स्मशाभूमीतील कचरा, इतर अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत अवघ्या आठ वर्षांचा रितुल गोसावी व ११ वर्षांची तनुजा केवटे या चिमुकल्यांनी खराटा हाती घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता केली. मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरु असलेल्या स्मशाभूमी स्वच्छता अभियानाची प्रेरणा इतर गावांतील युवक मंडळांंनीही घेतली आहे.
ग्रामपंचायतीची मदत
गावातील युवकांनी स्मशानभूमीची स्वच्छता मोहिम सुुरु केल्याचे समजातच माजी सभापती अप्पाराव कोरे, ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पाठविले. महिला सफाई कामगारांसह, लिपीक अमोल बाळगी, सतीश म्हेत्रे, वाहन चालक चाॅद शेख आदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला.

More Stories
महापालिकेच्या राजकारणात पराभव तरीही नव्याना घेऊन व्यवसाय उभारणी
Rto मधील निवृत्त हेडक्लार्क हरवाळकर यांचा दुचाकी अपघातात मृत्यू
महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी दयानंद परिचारक यांची निवड